पं.स. सभापतींसह 4 सरपंचांचा फैसला 3 मार्चला! इच्छुकांना जोश, राजकीय हालचालींना वेग

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या पंधरवड्यात जिल्ह्यात धुमाकूळ घालून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ करणाऱ्या कोरोनामुळे 2 पंचायत समिती सभापती व ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र आता या पदाचा फैसला 3 मार्चच्या मुहूर्तावर होणार आहे. यामुळे थंडावलेल्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या पंधरवड्यात जिल्ह्यात धुमाकूळ घालून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ करणाऱ्या कोरोनामुळे 2 पंचायत समिती सभापती व ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. मात्र आता या पदाचा फैसला 3 मार्चच्या मुहूर्तावर होणार आहे. यामुळे थंडावलेल्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला असून इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे.
जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापतींची निवडणूक 26 फेब्रुवारीला लावण्यात आली होती. दोन्ही सभापतींनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हापरिषद अध्यक्षांकडे सादर केले असता त्यांनी ते तात्काळ मंजूर केले. यामुळे रिक्त पदांसाठी 26 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली होती. तसेच देऊळघाट (ता. बुलडाणा), नारखेड ( ता.नांदुरा) आदी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक याच दिवशी लावण्यात आली होती. देऊळघाटमध्ये तर सुधारित आरक्षणाचा म्हणजे अनुसूचित जाती संवर्गाचा एकच सदस्य असल्याने सरपंच निवड केवळ औपचारिकता ठरली होती. मात्र आता दोन्ही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे इच्छुक व निवड निश्चित असलेल्यांना कोरोनामुळे राजकीय धक्का बसने स्वाभाविक ठरले. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सभापतींची निवड 3 मार्चला करण्यात येणार आहे. याशिवाय देऊळघाट, नारखेडसह खैरव ( ता. चिखली), वडगाव गड ( ता. जळगाव जामोद) येथील सरपंच पदाची निवड देखील 3 मार्च रोजीच होऊ घातली आहे.

असा राहणार कार्यक्रम

  • दुपारी 2 वाजता विशेष सभा
  • सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेदरम्यान नामांकन
  • दुपारी 2 वाजता सभा सुरू झाल्यावर अर्जाची छाननी व माघार घेण्यासाठी वेळ
  • आवश्यक असेल तर मतदान