निसटता पराभव काळजाला टोचणारा; पराभवानंतर बुलडाण्यात महाविकास आघाडीची चिंतन बैठक;

  नेते म्हणाले, लागलेला निकाल न उमगलेले कोडे! पुन्हा नव्याने कामाला लागण्याचा निर्धार..
 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांचा ८४१ मतांनी अगदी निसटता पराभव झाला. हा पराभव काळजाला टोचणारा असल्याच्या प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज व्यक्त करण्यात आल्या. बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज,५ डिसेंबरला चिंतन बैठक पार पडली, या बैठकीत पराभवाचे चिंतन करण्यात आले. लागलेला निकाल हा न उमगणारे कोडे आहे, मात्र खचून न जाता पुन्हा एकदा नव्याने कामाला लागण्याची आवाहनही नेते मंडळींनी या बैठकीत केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार सौ रेखाताई खेडेकर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जयश्री ताई शेळके, संजय राठोड, प्रा.लहाने , नरेश शेळके, गणेशसिंग राजपूत, ॲड.शरद काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advt
Advt. 👆
यावेळी बोलताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जयश्रीताई शेळके यांच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. मात्र तरीही आपण कुठे कमी पडलो याचे चिंतन आपल्याला करावे लागणार आहे. अगदी निसटत्या मतांनी आपला पराभव झाल्यामुळे हा पराभव काळजाला टोचणारा असल्याचे नरेंद्र खेडेकर म्हणाले. रेखाताई खेडेकर म्हणाल्या की, जयश्रीताई शेळके यांनी ताकदीने लढत दिली.. निवडणुकीत जय पराजय होतच राहतात. मात्र कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये, त्यांच्या विजयापेक्षा आपल्या पराजयाची चर्चा जास्त आहे असेही त्या म्हणाल्या. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी शिवसैनिकांनी दिलेल्या लढ्याचे कौतुक केले. आता निवडणूक संपली आहे, आता वेळ समाजकारणाची आहे. कारण ८० टक्के समाजकारण आणि २० राजकारण ही आपली शिकवण असल्याचे ते म्हणाले. जयश्रीताई शेळके यांनी प्रचारासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. पराभव झाला म्हणून मी थांबणार नाही, तुमचे उपकार विसरणार नाही. तुमची बहीण तुमच्यासाठी २४ तास मैदानात आहे असे त्या म्हणाल्या...