निवडणूक ग्रामपंचायतीची… ८७५ बिनविरोध सदस्यांची खातरजमा झाली बरं!; जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केला अहवाल
बुलडाणा (संजय मोहिते : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कथितरित्या व लाखोंमध्ये लिलाव झाल्याचा पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राज्याप्रमाणेच बुलडाणा जिल्ह्यातील बिनविरोध निवडून आलेल्या तब्बल ८७५ ग्रामपंचायत सदस्यांच्या वैध निवडीची खातरजमा करून घेतली आहे. यासंदर्भातील अहवाल निवडणूक निरीक्षकांनी नुकतेच सादर केला.
ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर काढण्यात येणार आहे. मात्र याउप्परही उत्तर महाराष्ट्रातील एका ग्रामपंचायत सरपंच पदाचा तब्बल ४२ लाखांत लिलाव झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. एवढ्या वरच ना थांबता अगदी बुलडाणा जिल्ह्यातीलही सर्वच बिनविरोध सदस्यांची निवड वैधरित्या झाली की नाही याची खातरजमा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले, बुलडाणा जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या ४८०५ पैकी ८७५ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यात चिखली तालुक्यातील १४३, खामगाव ११४, सिंदखेडराजा ८५, नांदुरा ८१, मोताळा ७५ या तालुक्यांतील बिनविरोध सदस्यांची संख्या लक्षणीय आहे. बिनविरोध ग्रामपंचायत व सदस्य पदांसाठी इतर सदस्यांवर दबाव आणण्यात आला नाही, एकाच प्रभागातील एकाच प्रवर्गाच्या एकापेक्षा अधिक जागांवर बिनविरोध निवडून येताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनियमितता केली नसून ते नियमानुसार बिनविरोध निवडून आले. त्यांच्याविरुद्ध कोणतीही लेखी तक्रार अथवा न्यायालयात प्रकरण दाखल नाही, असा अहवाल १३ तालुक्यांच्या निरीक्षकांनी सादर केला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तसा एकत्रित अहवाल आयोगाला सादर केला.