निवडणूक ग्रामपंचायतची… कंटेन्मेंट झोनमधील त्या मतदारांनाच करता येईल सकाळपासून मतदान!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रतिबंधित क्षेत्रातील (कन्टेन्मेंट झोन) ग्रामस्थांनाही मतदान करता येणार असून, त्यासाठी मात्र काही अटींचे पालन करावे लागणार आहे. निवडणूक आयोगान आज, 13 जानेवारीला यादृष्टीने आदेश काढला असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळ व निवडणूक यंत्रणेतील संभ्रम दूर झाला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त अविनाश सणस यांनी आज यासंदर्भातील निर्देश दिले. यानुसार कंटेन्मेंट झोनमधील जे रहिवासी कोविड- 19 बाधित नाहीत व दोनदा तपासून देखील ज्यांचे तापमान निर्धारित पेक्षा कमी असेल त्यांना सर्वसामान्य मतदाराप्रमाणे सकाळी 7 ः 30 वाजेपासून मतदान करता येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो मतदारांना दिलासा मिळणार आहे. मात्र झोनमधील रहिवासी व कोरोना बाधित किंवा दोनदा तपासून देखील ज्यांचे तापमान निकषापेक्षा जास्त असेल त्यांना नियमितपणे मतदान करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यांना मतदान केंद्रावरील विलगीकरण कक्षात थांबवून मतदानाच्या अर्ध्या तासापूर्वी म्हणजे संध्याकाळी 5 ते 5ः30 वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे. मात्र यासाठी त्यांना सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.