ना. प्रतापराव जाधवांच्या उपस्थितीत उद्या वाशीम येथे महत्त्वाचा कार्यक्रम; क्षयरोग निर्मूलनासाठी ना. जाधवांच्या मंत्रालयाचा पुढाकार...
Dec 6, 2024, 19:17 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवशीय क्षयरोग मुक्त भारत मोहीमेचा राज्यस्तरीय शुभारंभ केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्या , ७ डिसेंबरला वाशीम येथे होणार आहेत.
जास्तीत जास्त क्षयरोग रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे, क्षयरुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, क्षयरोगाविषयी समाजातील भीती, अनिष्ट रूढी परंपरा, भेदभावाची वागणूक कमी करण्यासाठी उपक्रम राबविणे, निक्षयमित्र यांचेकडून पोषण आहार कीटचे वाटप करणे हा उद्देश डोळ्या समोर ठेवुन राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवशीय क्षयरोग मुक्त भारत मोहीमेचे आयोजन केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. या माहिमेचा शुभारंभ उद्या, ७ डिसेंबरला केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांचे हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे. तर राज्यस्तरावरून या मोहिमेचा शुभारंभ त्याच दिवशी आयुष विभागाचा स्वतंत्र प्रभार असलेले आणि आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याहस्ते वाशीम येथिल कार्यक्रमातुन होणार आहे. १०० दिवशीय क्षयरोग मुक्त भारत मोहीम देशभरातील ३४७ जिल्ह्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील १७ जिल्हे आणि मुंबईसह एकूण १३ महानगरपालिकामध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा एक भाग प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून प्रौढ बी.सी.जी. लसीकरण मोहीमेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून त्यामध्ये कोमॉर्बीड रुग्ण, रोगप्रतिकारक शक्ती कमी असेलेल्या व्यक्ती, धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती, ६० वर्षावरील सर्व व्यक्ती यांना त्यांचे संमतीने प्रौढ बी.सी.जी. लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच पल्मोनरी क्षयरुग्णांच्या संपर्कातील पात्र व्यक्तींची सी.वाय.टीबी (CY -TB) तपासणी करून त्यात पॉझिटिव्ह येणा-या व्यक्तींना टीपीटी चालू करण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवुन क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी पुढे यागे असे आवाहन ना. प्रतापराव जाधव यांनी केले आहे.