धाडसी शेतकऱ्याचे बिबट्याशी दोन हात!; मोताळा तालुक्यातील आज पहाटेचा थरार
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिबट्याच्या रूपात साक्षात यमराज समोर दिसत असतानाही धाडसी शेतकऱ्याने त्याच्याशी दोन हात केले. आरडाओरड ऐकून परिसरातील शेतकरी धावून आल्याने बिबट्याने पळ काढला. ही थरारक घटना आज, १५ जूनच्या सकाळी ७ च्या सुमारास टाकळी (ता. मोताळा) शिवारात घडली. या घटनेत शेतकरी जखमी झाला असून, त्याला बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या पेरणीची लगबग सुरू आहे. त्यामुळे शेतकरी गजानन जगदेव नागोलकर (४७) सकाळी शेतात गेले होते. त्यांच्या शेतातील धुऱ्यावर एका नाल्यात ४० ते ५० फूट खोल अशी धव अर्थात गुफेसारखी पोकळी आहे. यात बिबट्या बछड्यासोबत राहत असल्याचे सांगण्यात येते. गजानन नागोलकर जात असताना त्यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. मात्र हल्ल्याने घाबरून न जाता त्यांनी बिबट्याशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला. बिबट्याशी लढताना आरडाओरड ऐकून लोक धावून आले. त्यामुळे बिबट्या पळाला. शेतकरी नागोलकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्याने अधिकारी गावात पोहोचले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.