देऊळगाव राजा तालुक्यात 480 उमेदवार नशिब आजमावणार; 142 जणांची माघार!
देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. पाडळी शिंदे येथे 9 जागांसाठी 9 अर्ज, पिंपळगाव बुद्रूक येथे 9 जागांसाठी 9 अर्ज, नागनगाव येथे 7 जागांसाठी 7 अर्ज आल्यामुळे या तिन्ही ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याचे तहसीलदार सरिका भगत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आता तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तालुक्यात 598 उमेदवारांनी 648 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत 15 अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे 633 उमेदवार रिंगणात होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काल काही उमेदवारांची समजूत काढण्यात गाव पुढार्यांना यश आले. त्यामुळे देऊळगाव राजा तालुक्यातील 142 उमेदवारांनी आपले 153 अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता 480 उमेदवार नशिब आजमावणार आहे. मतदान 15 जानेवारीला आणि निकाल 18 जानेवारीला जाहीर होणार आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. यात टेबल फॅन, रिक्षा, जग, टिव्ही, कपबशी, टेबल या प्रमुख चिन्हांची निवड उमेदवार करताना दिसले.