तुम्ही फोन का बंद ठेवता?, सुरू असला तरी उचलत नाही…; आमदार रायमूलकरांनी “महावितरण’च्या अधिकाऱ्यांना खडसावले
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर विधानसभा मतदारसंघातील वीज समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार संजय रायमूलकर यांनी काल, २९ ऑगस्ट रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी आपले मोबाइल बंद ठेवतात. सुरू असला तरी उचलत नाहीत. वीज खंडित झाल्यावर नागरिकांनी तुमच्याशी संपर्क साधावाच कसा, असा सवाल आमदार रायमूलकर यांनी अधिकाऱ्यांना केला.
पावसाळ्यात रात्री बेरात्री वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे लोकांना अडचण निर्माण होते. त्यासाठी लोक अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र अधिकारी उत्तर देत नसल्याच्या तक्रारी प्राप्त असल्याचे आमदार रायमूलकरांनी सांगितले. अभियंत्यांनी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी लोकांची कामे वेळेवर करायला पाहिजेत. फोन बंद न ठेवता लोकांना समाधानकारक उत्तर दिले पाहिजे, अशी सूचना आमदारांनी अधिकाऱ्यांना केली. महावितरण कंपनीला लागणारे पुरेसे साहित्य उपलब्ध नाही.त्यामुळे दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत, असे अभियंत्यांनी आमदारांना सांगितले. यावर आमदार रायमूलकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व आवश्यक ते साहित्य वेळेत पुरविण्याचे निर्देश दिले.