तीनदा टळली, चौथ्यांदा झाली! रुपचंद पसरटे नशिबाने भारी, झाले देऊळघाटचे कारभारी!!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः बुलडाणा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या देऊळघाट ग्रामपंचायतीच्या राजकारणाची तऱ्हाच न्यारी. तिथलं राजकारणच भारी! 17 सदस्यांची निवडणूक सुद्धा भारी ठरली असतानाच सरपंच निवडसुद्धा एकदा नव्हे तीनदा पुढे ढकलण्यात आली. अखेर ( व एकदाची)आज, ४ मार्चला ही निवडणूक बिनधोक व कडक बंदोबस्तात पार पडली.
यापूर्वी 3 मार्चच्या मुहूर्तावर तिसऱ्यांदा आयोजित सरपंच निवडीसाठीची सभा कोरम अभावी बारगळली होती. 26 फेब्रुवारीला आयोजित सभा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती तर 9 फेब्रुवारीला आयोजित सभा निर्धारित आरक्षणाचा ( एससी महिला) सदस्यच नसल्याने पुढे ढकलण्यात आली होती. इजा, बिजा, तिजा या धर्तीवर तीनदा टळल्यावर अखेर आज 4 मार्चला ग्रामपंचायत भवनात कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेली सभा ‘ यशस्वी’ ठरली! सरपंचपदी रुपचंद पसरटे यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी अमरसिंह पवार यांनी परवीनबी जावेदखान यांचा अर्ज फेटाळला. निकाल जाहीर होताच बबलूसेठ समर्थकांनी आपल्या स्टाईलमध्ये एकच जल्लोष करीत एकमेकांना ‘ मुबारक बात’ दिली.