…तर तुमचा लौकिक वाढेल अन् आमचाही; खासदार प्रतापराव जाधव यांनी दिल्या नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांना मौलिक सूचना
मेहकर (विष्णू आखरे पाटील ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पुढील पाच वर्षे जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार-खासदार कार्यालयाशी नियमित संपर्क ठेवून ग्रामविकासाच्या योजना माहिती करून घ्या. त्या तुमच्या गावात राबविण्यासाठी पाठपुरावा करा. वेळप्रसंगी आमचे सहकार्य घ्या. यातून तुमचा नावलौकिक वाढेल. सोबतच आमचाही वाढेल, असे प्रतिपादन खासदार तथा केंद्रीय ग्रामविकास समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी केले.
मेहकर व लोणार तालुक्यातील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ आज, 23 जानेवारी रोजी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पर्वावर मेहकर येथील वेदिका लॉनवर शिवसेनेतर्फे करण्यात आला. यावेळी खासदार श्री. जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे आमदार तथा पंचायत राज समितीचे प्रमुख डॉ. संजय रायमूलकर होते. व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत, जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, कृषी बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, भास्करराव मोरे, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, पंचायत समिती सभापती निंबाजी पांडव, जिल्हा परिषद सदस्य आशिष राहटे, संतोष चनखोरे, माजी सभापती आशाताई झोरे, मेहकर पंचायत समितीचे माजी उपसभापती राजू घनवट, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, नगर परिषद उपाध्यक्ष जयचंद भाटिया आदी उपस्थित होते.