जिल्ह्यात ‘रासप’ वाढविणार्‍या सुभाषसिंह राजपुतांनी हातात बांधले घड्याळ!

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषसिंह राजपूत यांनी आज, 15 जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांचे ते अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. जिल्ह्यात रासप वाढविण्यासाठी त्यांनी अनेक मेळावे आणि आंदोलने केली होती. राजपूत युवा मंचचे …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाषसिंह राजपूत यांनी आज, 15 जानेवारीला मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माजी कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांचे ते अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. जिल्ह्यात रासप वाढविण्यासाठी त्यांनी अनेक मेळावे आणि आंदोलने केली होती. राजपूत युवा मंचचे संस्थापक असलेले सुभाषसिंह राजपूत करणी सेनेचे महामंत्री सुद्धा आहेत. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच जाणकारांचे मंत्रिपद गेल्यापासून रासपचे बरेच नेते विजनवासात होते. आज अखेर राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी त्यांच्यासोबत प्रवेश करणार्‍या राज्यभरातील रासप च्या 700 कार्यकर्त्यांची यादी देखील जयंत पाटील यांच्याकडे सोपविली.
रासपमध्ये प्रदेश उपाध्यक्ष होते राष्ट्रवादीत काय मिळेल?
राष्ट्रीय समाज पक्षात असताना संपूर्ण राज्याची जबाबदारी देत प्रदेश उपाध्यक्ष पदाची धुरा महादेव जानकर यांनी सुभाषसिंह राजपूत यांच्या खांद्यावर सोपविली होती. परंतु इकडे राष्ट्रवादीत नेत्यांची भली मोठी यादी असताना त्यात आता श्री. राजपूत यांना कुठे अ‍ॅडजस्ट करतात, हे लवकरच समोर येईल.