चिखली हद्दवाढ : श्रेयासाठीच्या चढाओढीत नगराध्यक्षाही!; नागरिक म्हणतात, प्रियाताईंचा सर्वप्रथम पुढाकार!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहराच्या हद्दीवाढीला मान्यता मिळाल्यानंतर आजी-माजी आमदारांत त्याचे श्रेय घेण्यासाठी रंगलेल्या चढाओढीत नगराध्यक्षांनाही नागरिकांनी ओढले आहे. आजी-माजी आमदारांनी प्रयत्न केले असतीलही, मात्र यासाठी नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांनीच सर्वप्रथम पुढाकार घेतल्याचे हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांनी म्हटले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या भागाचा आता विकास होईल, अशी आशा रहिवाशांना आहे. हद्दवाढीच्या प्रस्तावाला मान्यता मिळताच चिखलीत आजी- माजी आमदारांनी आपल्याच प्रयत्नांना यश मिळाल्याचा दावा केला. त्यानंतर त्या भागातील रहिवाशांच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटायला सुरुवात झाली. गेल्या 4 वर्षांपासून चिखली शहरात भाजपच्या प्रियाताई कुणाल बोंद्रे नगराध्यक्षा आहेत. नगराध्यक्षा, नगरसेवक, नगरपलिका प्रशासनाने शहराच्या हद्दीवाढीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. नगरपालिकेच्या ठरावाशिवाय असा कुठलाही निर्णय सरकार घेत नसते. हद्दवाढीचा ठराव घेणे, तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करणे, मंत्रालय स्तरावरही विविध बैठकांना हजेरी लावून हा विषय मार्गी लावण्याचे काम नगराध्यक्षांनी केले आहे. मात्र आजी- माजी आमदारांनी हे काम कसे केवळ आपल्यामुळेच झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला. दोन्ही आमदार श्रेय घेण्यासाठी लढत असताना नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यांनी मात्र यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांनाच धन्यवाद दिले आहेत, हे विशेष.
काय म्हणाल्या नगराध्यक्षा…
चिखली शहराच्या हद्दवाढीसाठी आपापल्या स्तरावर प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद. ही हद्दवाढ म्हणजे केवळ एकट्या व्यक्तीचा विजय नसून सांघिक प्रयत्ननांना मिळालेले यश आहे. नगरपालिका हद्दीत समावेश झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
– सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे, नगराध्यक्षा, चिखली
रहिवासी म्हणतात…
विकासापासून कोसो दूर असलेल्या सदानंदनगराचा नगरपालिका हद्दीत समावेश झाला ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. फुकटचे श्रेय कुणी घेऊ नये. आमच्या वेदना आम्हालाच माहीत आहेत. हद्दवाढीसाठी कुणी प्रयत्न केले हे जनतेला माहीत आहे. नगरापालिका हद्दीत नसतानाही आमच्या नगरासाठी प्रियाताई व कुणाल बोंद्रे धावून आले. लॉकडाऊन काळात ते सतत येथील जनतेच्या संपर्कात राहिले. त्यामुळे नगरपालिका हद्दवाढीचे खरे श्रेय नगराध्यक्षा प्रियाताई बोंद्रे यांचेच आहे.
– अक्षय जैवाळ, नगरपालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या सदानंद नगरातील रहिवाशी