चिखली नगर परिषदेत विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समितीची निवडणूक काल, 25 फेब्रुवारीला झाली. यावेळी बांधकाम सभापती म्हणून सौ. ममताताई बाहेती, शिक्षण सभापती म्हणून सौ. विमलताई देव्हडे तर महिला व बालविकास सभापती म्हणून प्रभावती काकू एकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
चिखलीच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून चिखली मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी काम पाहिले. चिखली नगरपालिका भाजप गटनेते प्रा. राजू गवई यांच्यावतीने नगरसेवक गोविंद देव्हडे यांनी या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली. सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, पंचायत समिती सदस्या सौ. मनिषाताई सपकाळ, नगरसेवक नामु गुरुदासानी, शैलेश बाहेती, स्वीयसहायक सुरेश इंगळे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.