चिखली तालुक्यात संमिश्र निकाल; काही ठिकाणी जाणत्यांना संधी, काही ठिकाणी युवकांना गुलाल!

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचे निकाल आज, 18 जानेवारीला जाहीर झाले असून, काही ठिकाणी पुन्हा सत्ताधार्यांनाच कौल तर काही ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना सत्तेतून बाहेर खेचल्याचे चित्र आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीत सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात तगडा पोलीस …
 

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली तालुक्यातील 55 ग्रामपंचायतींचे निकाल आज, 18 जानेवारीला जाहीर झाले असून, काही ठिकाणी पुन्हा सत्ताधार्‍यांनाच कौल तर काही ठिकाणी युवकांनी प्रस्थापितांना सत्तेतून बाहेर खेचल्याचे चित्र आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या इमारतीत सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 55 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान झाले होते. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या अमडापुरात यंदा सत्तापरिवर्तन झाले असून, महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी 17 पैकी 13 जागांवर विजय मिळवत भाजपला धोबीपछाड दिली आहे. शेलसूर येथेही महाविकास आघाडीच्या 6 सदस्यांनी विजय मिळवला तर विरोधकांना 3 जागांवर समाधान मानावे लागले. इसोली येथे भाजप नेते विनोद सिताफळे यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले. 13 पैकी 10 जागांवर त्यांनी विजय मिळवला. तालुक्यातील तोरणवाडा, पळसखेड दौलत, कवठळ शेलोडी, नायगाव बुद्रूक, वाडी, ब्रह्मपुरी, करवंड, दहिगाव, मुरादपुर, आमखेड, शिंदी हराळी, पेठ ,येवता,कोलारा, भोरसा-भोरसी आदी गावांत भाजपने झेंडा फडकावल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे काँग्रेस प्रणित पॅनेलने एकलारा, सावरगाव डुकरे, हरणी, भालगाव, भोरसा-भोरसी, भोगावती, येवता, मंगरूळ नवघरे, धामणगाव, रायपूर, किन्होळा, शेलुद, उत्रादा, भोगावती या गावांत महाविकास आघाडीचा विजय झाल्याचा दावा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडून करण्यात येत आहे.

मनसेने उघडले खाते…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही चिखली तालुक्यात खाते उघडले असून, दहिगाव ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली आहे. 9 पैकी 8 सदस्य जिंकून आल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मदनराजे गायकवाड यांनी दिली.

अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापित सत्ताधार्‍यांना दणका मिळाल्याचे चित्र आहे. भाजपचा गड मानल्या जाणार्‍या अमडापुरात महाविकास आघाडीने जोरदार कमबॅक केला आहे. पळसखेड दौलत,क ोलारा या गावांतील निकालही उलटफेर करणारे ठरले आहेत.