ग्रामीण भागात विचारा मुख्यमंत्री कोणत्याच नंबरवर नाहीत!; माजीमंत्री बावनकुळे यांचा सिंदखेड राजात हल्लाबोल!!
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार फक्त पुण्याचे असल्यासारखे वागतात तर राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री केवळ त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित आहेत. त्यामुळे विकासकामांना ब्रेक लागला आहे, अशी टीका माजी ऊर्जामंत्री व भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंदखेड राजात केली.
भाजपा युवा मोर्चाच्या पश्चिम विदर्भातील युवा वारिअर्सच्या कार्यक्रमाची सुरुवात सिंदखेड राजा येथून आज, २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर, भाजपा प्रवक्ते विनोद वाघ, जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार तोताराम कायंदे उपस्थित होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १०० युनिट वीजबिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेचा त्यांना विसर पडला. शेतकऱ्यांना व राज्यातील नागरिकांना १०० युनिट वीजबिल माफी मिळायलाच हवी, असेही बावनकुळे म्हणाले.
केंद्र सरकारने १२७ वी घटना दुरुस्ती करून मोठे काम केले आहे. मात्र राज्य सरकारला ओबीसी व मराठा आरक्षण द्यायचेच नाही. राज्य सरकारला नव्याने मागासवर्ग आयोग नेमण्याची गरजही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण दिले होते. मात्र सध्याच्या आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण टिकले नाही. मुख्यमंत्री देशात नंबर एकवर आहे असे दाखविण्याचा प्रयत्न होतो मात्र ग्रामीण भागात विचारा. व्यावसायिकांना शेतकऱ्यांना विचारा मुख्यमंत्री कोणत्याच नंबरवर नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले.