गाव तसं चांगलं पण तक्रारीनं पांगलं…. आता सरपंचांचा फैसला जनता दरबारात!; जऊळकात काय होणार, अवघ्या सिंदखेड राजा तालुक्‍यात चर्चा

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील जऊळका येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. मात्र सरपंच जनतेतून निवडून आलेल्या असल्याने त्यांच्यावर सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव आता जनता दरबारात २ सप्टेंबरला मांडला जाणार असून, ग्रामसभेत ठराव मंजूर झाला तर त्यांना पायउतार व्हावे लागणार …
 
गाव तसं चांगलं पण तक्रारीनं पांगलं…. आता सरपंचांचा फैसला जनता दरबारात!; जऊळकात काय होणार, अवघ्या सिंदखेड राजा तालुक्‍यात चर्चा

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेड राजा तालुक्यातील जऊळका येथील महिला सरपंच द्वारकाबाई प्रभाकर सांगळे यांच्‍याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. मात्र सरपंच जनतेतून निवडून आलेल्या असल्याने त्यांच्यावर सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव आता जनता दरबारात २ सप्टेंबरला मांडला जाणार असून, ग्रामसभेत ठराव मंजूर झाला तर त्यांना पायउतार व्हावे लागणार आहे. त्‍यामुळे आता सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे.

जऊळकाच्‍या सरपंचाची निवडणूक नोव्हेंबर २०१७ मध्ये थेट जनतेतून झाली होती. निवडणूक होताच अगदी पंधरा दिवसांतच गावातील चार सदस्य हे उपसरपंच निवडणुकीसाठी सहलीवर गेले होते. त्यानंतर नामदेव बुधवत उपसरपंच झाले. नंतर गावात विकासाऐवजी राजकारण घुसल्याने उपसरपंचावर दोन वर्षांत दोनदा अविश्वास ठराव आणण्याच्‍या प्रक्रिया घडल्या. मात्र दोन्ही वेळेस उपसरपंचावर अविश्वास ठराव बारगळला होता. मात्र यामुळे सत्ताधारी गटात दोन गट पडले. एकमेकांच्या जिरवाजिरवीसाठी, सरपंच यांच्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे थेट न्यायालयात दाखल झाले. त्याच प्रमाणे उपसरपंचाचे अतिक्रमणाचे प्रकरणसुद्धा न्यायालयात दाखल झाले. यात गाव विकासापासून वंचित आहे. चार वर्षांमध्ये फक्त न्यायालयीन भांडणे सुरू झाली. याचाच परिणाम म्हणून सरपंच यांच्यावर ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास दाखल करून तो पारित केला. त्यामुळे गाव लहान असले तरी गाव तसे चांगले परंतु तक्रारीने पांगले, असे म्‍हणावे लागेल.

सरपंच सांगळे या जनतेतून निवडून आलेल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध उपसरपंचासह सहा सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तहसीलदार सुनिल सावंत यांनी सरपंचासह सर्व सदस्यांना नोटीस बजावून ४ ऑगस्ट रोजी अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ग्राम पंचायत कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ४ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष मतदान घेतले असता ६ विरुध्द २ मतांनी अविश्वास ठराव पारित झाला होता. मात्र सरपंच जनतेतून निवडून आलेल्या असल्याने सदस्यांनी अविश्वास जरी दाखवला असला तरी सरपंचाला पदावर राहण्याचा अधिकार आहे की नाही हे ठरविण्यासाठी ग्राम विकास मंत्रालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सावंत यांनी ग्राम पंचायत सचिवास नोटीस देऊन ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. २ सप्टेंबर रोजी होत असलेल्या ग्रामसभेचे आयोजन जिल्हा परिषद शाळा जऊळका येथे करण्यात आले आहे.