कोरोनाच्या धामधुमीत पं.स. सभापती निवडणुकीची धूम! जळगाव जामोद, संग्रामपूरमध्ये राजकीय हालचालींना वेग!! खामगावात उपसभापतीसाठी इच्छुक सरसावले…
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढत असतानाच जिल्ह्यातील निवडणूक ज्वर मात्र कायम राहणार असल्याचे मजेदार चित्र आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर पंचायत समिती सभापती तर खामगावात उप सभापती पदाची निवडणूक लागल्याने राजकीय हालचाली व इच्छुकांच्या फिल्डिंगने जोर धरलाय!
जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापतींची 26 फेब्रुवारी तर खामगाव उपसभापती पदासाठी उद्याच म्हणजे 17 फेब्रुवारीला निवड करण्यात येणार आहे. सभापती पदासाठी ओबीसी आरक्षण असल्याने इच्छुकांची संख्या जास्तच राहणार हे उघड आहे. यामुळे राजकारण तापले आहे. जळगाव जामोदच्या सभापती रंजना संतोष ठाकरे व संग्रामपूरच्या सभापती नंदा पांडुरंग हागे यांनी मागील 8 फेब्रुवारी रोजी दिलेले पदाचे राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार यांनी तडकाफडकी मंजूर केल्याने ही पदे रिक्त होती. यामुळे 26 फेब्रुवारी रोजी त्यासाठी पं. स. सभागृहात दुपारी 2 वाजता सभा लावण्यात आली आहे. 8 सदस्यीय या पं.स. पैकी जळगाव जामोदचे आरक्षण ओबीसी तर संग्रामपूरचे आरक्षण ओबीसी महिला असे आहे. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जामोदमध्ये 4 सदस्यांमध्ये चुरस असल्याचे चित्र आहे. संग्रामपुरात देखील 4 जण इच्छुक असल्याचे वृत्त आहे.
खामगावात डेप्युटीसाठी चुरस
दरम्यान, खामगाव पं. स. च्या उपसभापती शीतल मुंडे यांनी 8 फेब्रुवारीला दिलेला राजीनामा सभापती रेखा मोरे यांनी मंजूर केल्याने रिक्त पदांसाठी 17 फेब्रुवारीला निवडणूक घेण्यात येत आहे. दुपारी 2 वाजता पं. स. सभागृहात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडणार आहे. सकाळी ते दुपारी 12 वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 वाजता सभा सुरू झाल्यावर छाननी व माघार हे सोपस्कार पार पडल्यावर उपसभापतीची निवड करण्यात येईल.