कोरोनाचे राजकीय बळी! पं.स. सभापतींसह सरपंच निवडणुकांना स्‍थगिती!! मार्च एन्डनंतर फैसला

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या पंधरवड्यात जिल्ह्यात धुमाकूळ घालून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ करणाऱ्या कोरोनाने आता राजकारणालाही लॉकडाऊन करणे सुरू केलंय! परिणामी 2 पंचायत समिती सभापती व 2 ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. या पदाचा फैसला थेट मार्च एन्डनंतरच होणार असल्याचे खळबळजनक वृत्त आहे. जिल्ह्यातील जळगाव जामोद व …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या पंधरवड्यात जिल्ह्यात धुमाकूळ घालून परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ करणाऱ्या कोरोनाने आता राजकारणालाही लॉकडाऊन करणे सुरू केलंय! परिणामी 2 पंचायत समिती सभापती व 2 ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे. या पदाचा फैसला थेट मार्च एन्डनंतरच होणार असल्याचे खळबळजनक वृत्त आहे.

जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर पंचायत समितीच्या सभापतींची निवडणूक येत्या 26 फेब्रुवारीला लावण्यात आली होती. सभापतींनी आपल्या पदाचे राजीनामे जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केले असता त्यांनी ते तात्काळ मंजूर केले. यामुळे रिक्त पदांसाठी 26 फेब्रुवारीला दुपारी 2 वाजता पंचायत समिती सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे आता ही निवडणूक लांबणीवर पडल्याने उपसभापतीच प्रभारी म्हणून काम पाहतील. दुसरीकडे निर्धारित आरक्षणमुळे लांबणीवर पडलेल्या देऊळघाट ( ता. बुलडाणा) व नारखेड ( ता. नांदुरा) ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक देखील 26/2 च्या मुहूर्तावर पार पडणार होती. देऊळघाटमध्ये तर सुधारित अनुसूचित जाती संवर्गाचा एकच सदस्य असल्याने सरपंच निवड केवळ औपचारिकता ठरली होती. मात्र आता दोन्ही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे इच्छुक व निवड निश्चित असलेल्यांना कोरोनामुळे राजकीय धक्का बसने स्वाभाविक ठरले आहे.