कोण होईल देऊळगाव महीचा सरपंच? पालकमंत्री कोणाच्या नावाला देणार पसंती? 11 फेब्रुवारीला रंगणार महामुकाबला
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यातील सर्वात मोठी आणि पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणार्या देऊळगाव मही येथील सरपंच पदाची निवडणूक 11 फेब्रुवारीला होणार आहे. सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने अनेक मातब्बर सदस्यांनी फिल्डिंग लावली आहे. स्व. भास्करराव शिंगणे पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकल्याने पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणतील तेच देऊळगाव महीमध्ये होईल हे स्पष्ट दिसत आहे.
स्व. भास्करराव शिंगणे पॅनलकडून वंदना शिंगणे, लक्ष्मी म्हस्के, सय्यद नफीसबी हबीब, जोत्सा शिंगणे यांची नावे सरपंच पदासाठी आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. 17 सदस्य असलेल्या देऊळगाव मही ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती रियाज खाँ पठाण यांच्या स्व. भास्करराव शिंगणे पॅनलने 11 जागा मिळवल्या आहेत, तर प्रतिस्पर्धी ग्राम विकास पॅनलने 6 जागा जिंकल्या आहेत. सदस्य फुटू नयेत यासाठी स्व. भास्कराव शिंगणे पॅनलचे सर्व 11 सदस्य सहलीला रवाना झाले असले तरी त्यातील 3 सदस्य गळाला लावण्याच्या जोरदार हालचाली ग्राम विकास पॅनलकडून होत आहेत. स्व भास्कराव शिंगणे पॅनलमध्ये सरपंच पदाच्या इच्छुकांची संख्या अधिक असल्याने सरपंच निवडताना पॅनल प्रमुखांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे. पुढील वर्षी मार्च 2022 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेता सरपंच निवडताना फायदा तोट्याचे गणित सुद्धा विचारात घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सदस्यांच्या नाराजीचे खापर आपल्यावर नको म्हणून सरपंच निवडीचा चेंडू थेट पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या कोर्टात ढकलल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पालकमंत्री डॉ. शिंगणे कोणाला हिंरवी झेंडे दाखवतात हे 11 तारखेलाच स्पष्ट होईल.