एकलारा येथे परिवर्तन पॅनलकडून वाढल्या ग्रामस्थांच्या अपेक्षा!; म्हणाले, विकासात खूप मागे पडलेय गाव, यावेळी वेगळा विचार करणार!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या 10 वर्षांत एकलारा गावाचा विकास खुंटला. मिळालेली सत्ता, त्या सत्तेतून पैसा आणि त्याच पैशांतून पुन्हा पुन्हा सत्ता मिळवण्याचा हव्यास एकलारा येथील नागरिकांनी बघितला आहे. त्यामुळे या सत्तेला उखडून लावत रोष व्यक्त करण्याचा निर्धारच जणू एकलाराच्या ग्रामस्थांनी केलेला तेथे भेट दिल्यानंतर दिसून आले. दुसरीकडे एकलारा येथील परिवर्तन पॅनल हे अनुभवी, उच्चशिक्षित, युवा आणि सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या जनसेवकांना निवडणूक रिंगणात उतरले असून, विकासाचा ठोस आराखडा त्यांना जनतेपुढे ठेवल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
युवकांच्या कल्याणाच्या अनेक योजनांचा या आराखड्यात समावेश असल्याने युवकांची मोठी पसंती पॅनलला मिळत आहे. सर्व समाजांना सोबत घेऊन स्मार्ट ग्राम करण्याचे व्हिजन ठेवले असल्याने परिवर्तन पॅनेलच्या प्रचाराला सध्या चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रस्थापित विरोधकांचे अवसान गळाल्याचे चित्र आहे. ग्रामस्थांशी संवाद साधला असता यावेळी गावात सत्तापरिवर्तन घडून येण्याची शक्यता जाणवली. गावात सध्या अनेक प्रश्न कायम आहेत. अन्य गावांच्या तुलनेत विकासात सतत मागे पडणार्या एकलाराला आता परिवर्तन पॅनलचा हा विकास आराखडा किती तारतो हे बघणे रोमांचक ठरणार आहे.