उमेदवाराच्या प्रतिनिधीसही देता येतो माघारीचा अर्ज; गारठवणार्या थंडीत रंगलेय माघारीचे नाट्य!; साम, दाम, दंड, भेदचा सर्रास वापर
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 527 ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे प्राथमिक चित्र स्पष्ट करणार्या उमेदवारी माघारीचे नाट्य गेल्या 4 दिवसांपासून रंगले आहे. आता या नाट्याने कळस गाठला असून अंतिम मुदतीत म्हणजे 4 जानेवारीला या घडामोडींच्या पडद्याआड असलेल्या सूत्रधारांचे मनसुबे किती यशस्वी होतात, हे स्पष्ट होणार आहे.
527 ग्रामपंचायतींच्या 1771 प्रभागांतील 4751 जागांसाठी 13 हजारांवर अर्ज आल्याने लढतीतील चुरस स्पष्ट झाली. यातच थर्टी फर्स्टला झालेल्या छानणीत जेमतेम 200 अर्ज बाद झाले. यामुळे ग्रामीण नेते, गाव पुढारी, आजी- माजी भावी सरपंचांचे मनसुबे, डावपेच धोक्यात आले असून, प्रभागातील लढती गुंतागुंतीच्या ठरल्या. सरपंच निवड सदस्यांतून होणार असल्याने बहुमत मिळवणे वा जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे आवश्यक ठरले आहे. यामुळे एकेक जागा महत्त्वाची ठरली आहे. या परिणामी 31 डिसेंबरपासून सुरू झालेल्या माघारीच्या राजकारणाने आता कळस गाठला आहे. उद्या 4 तारखेला अंतिम मुदतीत म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत सुत्रधारांचे डावपेच कितपत यशस्वी होतात व किती जण माघार घेतात हे एकाचवेळी स्पष्ट होणार आहे.
काय आहे तरतूद…
दरम्यान, सर्वसामान्यांना माघार केवळ 4 जानेवारीलाच घेता येते असा गैरसमज आहे. मात्र तसे नसून छाननी झाल्यावर उमेदवारांना माघार घेता येते. 4 ही केवळ अंतिम मुदत आहे. याची माहिती असणार्यांनी आपला कार्यभाग साधून घेतला असणार हे उघड आहे. मात्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी माघारीच अर्ज देता येत नाही व तहसीलदारांना तो स्वीकारता येत नाही, असे निवडणूक नियम 13 मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 4 जानेवारीला सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधीने सही केलेली वा अंगठा उमटवलेली लेखी नोटीस विहित नमुन्यात सादर केल्यासच त्याला माघार घेता येते. ही नोटीस मिळाल्यावर व त्याची खात्री पटल्यावर त्याला पोचपावती देण्यात येऊन तहसीलच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करावी, असे निर्देश आहेत. मात्र एकदा नोटिस दिली की खेळ खल्लास याचे भान उमेदवारांनी ठेवणे आवश्यक आहे. याचे कारण ही नोटीस रद्द करता येत नाही. यामुळे माघारीचा विचार करणार्या उमेदवारांनो सावधान… रात्रच नाही दिवसही वैर्याची आहे! 4 जानेवारीचा सकाळी 11 ते 3 दरम्यानचा काळ तर धोक्याचाच आहे!!