इलेक्शन ग्रामपंचायतीचं… बिनविरोध निवडीचे चित्र उद्या होणार स्पष्ट; निवडणूक चिन्हांचेही होणार वाटप!
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सोमवारचा दिवस अर्थात 4 जानेवारीचा दिवस 527 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी महत्त्वाचा व निर्णायक ठरणार आहे. याच दिवशी माघारीचे व लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. याचबरोबर बिनविरोध निवडीचे चित्र देखील समोर येणार असून, रिंगणातील हजारो उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटपदेखील करण्यात येईल.
सोमवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. या मुदतीत 527 ग्रामपंचायतींमधील 13 हजारांवर उमेदवारांपैकी किती जणांनी माघार घेतली याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर रिंगणातील भाऊगर्दी कमी होते की कायम राहते हे समजणार आहे. याशिवाय दुपारी 3 नंतर निवडणूक निर्णय अधिकारी किती सदस्य बिनविरोध आलेत याची अधिकृत घोषणा करतील. त्यापूर्वी निवडणूक आयोगाला अहवाल सादर केल्यावर व त्यांच्या मान्यतेनंतरच ही घोषणा कारवाई करावी लागते. या उमेदवाराला विजयासह डिपॉझिट रक्कम सुद्धा परत मिळण्याचे प्रवधान आहे. मात्र बिनविरोध आला म्हणजे सर्व झाले असे नाही तर त्या नशीबवान मेंबरला खर्चाचा हिशेब द्यावाच लागतो. बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर झाल्यापासून दुसर्या दिवशीच व 18 जानेवारीला निकाल लागल्यावर 30 दिवसांचे आत त्यांनाही अंतिम हिशोब देणे बंधनकारक आहे.
चिन्ह वाटप
दरम्यान उद्या माघार संपली की दुपारी 3 वाजेपासून उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. आयोगाने निर्धारित केलेल्या 190 मुक्त चिन्हांतूनच एक चिन्ह मिळणार आहे. ते प्रभागनिहाय करण्यात येते.