आश्‍चर्यम् … चिखलीत भाजप नगरसेवकाला काँग्रेसचा पाठिंबा!; सभापती निवडीत गोंधळच गोंधळ; अधिकार्‍यांविरोधात सत्ताधारी भाजपचा सभात्याग; केवळ दोन सभापतींची निवड, तिघांचे अर्ज बाद

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आली असतानाच शेवटच्या वर्षातील सभापतींची निवडणूक आज, 21 जानेवारीला अर्धवट पार पडली. या निवडणुकीत केवळ दोनच सभापतींची निवड करण्यात आली तर तीन जागांसाठी आलेले भाजपचे अर्ज निवडणूक अधिकार्यांनी बाद ठरवल्याने भाजपच्या छत्रपती आघाडीने सभात्याग केला. दुपारी 3 वाजता या निवडणुकीसाठी नगर परिषद कार्यालयात …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगर परिषदेची निवडणूक तोंडावर आली असतानाच शेवटच्या वर्षातील सभापतींची निवडणूक आज, 21 जानेवारीला अर्धवट पार पडली. या निवडणुकीत केवळ दोनच सभापतींची निवड करण्यात आली तर तीन जागांसाठी आलेले भाजपचे अर्ज निवडणूक अधिकार्‍यांनी बाद ठरवल्याने भाजपच्या छत्रपती आघाडीने सभात्याग केला. दुपारी 3 वाजता या निवडणुकीसाठी नगर परिषद कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी काम पाहिले.
यावेळी आरोग्य सभापती पदासाठी भाजप नगरसेवक विजय नकवाल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. पाणीपुरवठा सभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपकडून त्यांच्या आघाडीतील शिवसेना नगरसेवक दत्ता सुसर यांचा अर्ज बाद ठरवल्याने काँग्रेस नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन अर्ज दाखल केलेले भाजपचे बंडखोर नगरसेवक गोपाल देव्हडे यांची पाणीपुरवठा सभापती पदी निवड करण्यात आली. उर्वरित तीन सभापती पदांसाठी सत्ताधारी छत्रपती आघाडीचे तिन्ही अर्ज पिठासीन अधिकार्‍यांनी बाद ठरवल्याने सत्ताधारी आघाडीने सभात्याग करत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत निदर्शने केली.
भाजपच्या बंडखोर नगरसेवकाला सभापतीपद, काँग्रेसचा जल्लोष
भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नगरसेवक गोपाल देव्हडे यांच्या अर्जावर काँग्रेस नगरसेवकांनी सूचक, अनुमोदक म्हणून सह्या केल्या. त्याच पदासाठी सत्ताधारी भाजपच्या छत्रपती आघाडीकडून आलेला शिवसेना नगरसेवक दत्ता सुसर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आल्याने गोपाल देव्हडे यांची पाणीपुरवठा सभापती म्हणून निवड करण्यात आली. यावेळी काँग्रेस नगरसेवकांनी एकच जल्लोष केला तर भाजपच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. गोपाल देव्हडे हे माजी मंत्री आणि जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय मानले जातात. पक्षादेश झुगारून गोपाल देव्हडे यांनी काँग्रेस नगरसेवकांची मदत घेतल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
27 सदस्यीय नगरपरिषदेत भाजपच्या छत्रपती आघाडीची सत्ता आहे. आघाडीत 13 भाजप, शिवसेना 1, राष्ट्रवादी 2 आणि अपक्ष 1असे एकूण 17 नगरसेवक भाजपच्या बाजूने आहेत. त्यापैकी भाजपच्या एका सदस्याने आज काँग्रेसची बाजू घेतल्याने भाजप आघाडीची संख्या 16 होण्याची शक्यता आहे.
गोलमाल हैं…


आजच्या निवडणुकीसाठी भाजप नगरसेवक गोपाल देव्हडे हे काँग्रेसच्या पाठिंब्याने सभापती झाल्याने चिखलीत एकच राजकीय खळबळ उडाली. गोपाल देव्हडे सभापती झाल्यानंतर नगराध्यक्ष पती कुणाल बोंद्रे हे गोपाल देव्हडे यांचे अभिनंदन करत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने देव्हडेंच्या निवडीमागे कुणाल बोंद्रे यांचा हात तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कुणाल बोंद्रे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते.