आमदार सौ. श्वेताताई महाले यांची मागणी ः भानखेड येथील मारलेल्या कोंबड्यांची नुकसान भरपाई तातडीने द्या
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बर्ड फ्लू झाल्यामुळे भानखेड येथील हजारो कोंबड्या प्रशासनाने मारून नष्ट केल्या. त्यामुळे कोबडी आणि अंडी उत्पादकांचे खूप मोठे नुकसान झालेले असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांच्याकडे लेखी पत्र देऊन केली आहे.
भानखेड येथील कोंबडी व अंडी उत्पादक शेतकर्यांच्या कोंबड्या मारल्याने तेथील कोंबडी पालक शेतकर्यांनी आमदार सौ. महाले पाटील यांची भेट घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी भानखेडचे सरपंच नितेश देवकर, पोलीस पाटील उपसरपंच, मिलिंद इंगळे, सचिन इंगळे, कैलास निर्मळे, भाजपा तालुका सहसचिव अनिल सुरडकर, भगवान इंगळे यांची उपस्थिती होती. मंत्री केदार यांना पाठविलेल्या पत्रात आमदार सौ. महाले पाटील यांनी म्हटले आहे, की भानखेड येथील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे आढळल्यामुळे प्रशासनाने तेथील कोंबड्या मारून नष्ट केल्या आहेत. परंतु कोंबडी व अंडी उत्पादकांना कोणत्याही प्रकारची मदत शासनाने अद्याप केली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पोल्ट्री फार्म उत्पादकांनी कर्ज घेऊन पोल्ट्री फार्मची उभारणी केली होती. काही खासगी शेतकरी सुध्दा कोंबड्या पाळून शेतीला जोड धंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त पोल्ट्री फार्म मालकांना सोबतच छोट्या मोठ्या कोबडी व अंडी उत्पादकांना मारलेल्या कोंबड्याची बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची सुध्दा मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी केली आहे.
बाधित क्षेत्रात तीन महिने कुक्कुटपालन न करण्याची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे तीन महिने काय करावे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. अगोदरच कोरोनामुळे हैराण झालेले कोंबडी पालक या बर्ड फ्लूच्या संकटाने मेटाकुटीस आले आहेत. इतर ठिकाणी बर्ड फ्लूची बाधा नसल्यास बंदीचा कालावधी पंधरा दिवसच करावा, अशीही मागणी आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी केली आहे.