आमदार श्वेताताई महाले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र ः “वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात पैनगंगा पेनटाकळी प्रकल्पाचा समावेश करा’
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः विदर्भाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पात पैनगंगा पेनटाकळी धरणाचा समावेश करून नेहमीच दुष्काळग्रस्त असलेले दक्षिण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार श्वेताताई महाले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा विभागाची बैठक घेऊन वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पाला कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु त्यात पैनगंगा पेनटाकळी प्रकल्पात पाणी आणण्याचे प्रस्तावित असतानाही आणि त्याबाबत सर्व्हेक्षण व अहवाल सादर झालेला असतानाही मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशामध्ये पैनगंगा पेनटाकळीचा उल्लेख नसल्याच्या पार्श्वभूमीवर आ. महाले पाटील यांनी त्यांना पत्र दिले. या पत्रात म्हटले आहे की, वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्पासोबतच खामगाव ते पेनटाकळी धरणापर्यंत प्रकल्पाला वाढविल्यास बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागासोबतच घाटावरील दुष्काळग्रस्त असलेल्या भागालाही याचा फायदा होऊन सोबतच दक्षिण बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध होणार आहे. संपूर्ण विदर्भाला प्रदक्षिणा घालणारी ही जलवाहिनीच उद्याच्या विदर्भाचे उज्ज्वल भविष्य ठरणार आहे. त्यामुळे वैनगंगा ते नळगंगा नदीजोड प्रकल्पामध्ये पैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा समावेश करून तो कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी आ. महाले पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.