आमदार गायकवाडांकडून वादावर पडदा; ‘खऱ्या’ वारकऱ्यांची मागितली माफी, राजकीय हेतून प्रेरित खोट्यांची माफी मागणार नाहीच म्हणाले! खोटे गुन्हे दाखल केले तर त्या अधिकाऱ्यावरही हक्कभंग आणणार!
बुलडाणा (मनोज सांगळे, मो. 9822988820, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सध्याच्या कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहण्यासाठी चिकन, मटन खाण्याचा सल्ला चाहते, कार्यकर्त्यांना बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी दिला होता. त्यावर वारकरी सांप्रदायाने आक्षेप घेतला होता. त्यातून काही मंडळींनी केलेले कॉल्स आणि त्यांना गायकवाडांनी दिलेले प्रत्युत्तर याची चर्चा गेल्या 5-6 दिवसांत रंगली होती. हा विषय वाढत जाऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत गेल्याने त्यांनी पाठविलेल्या निरोपानंतर गायकवाडांनी आपली तलवार आज, 15 मे रोजी अखेर म्यान केली. खऱ्या वारकऱ्यांची माफी मागताना त्यांनी राजकीय हेतूने प्रेरित होऊन उकसवणाऱ्या ‘खोट्या’ महाराजांची माफी मागणार नाही, हेही ठासून सांगितले. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न काही मंडळी करत आहेत. पण खोटे गुन्हे दाखल केले तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध मी हक्कभंग आणेन, असा इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.
आपण आजवर धर्मासाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन, महाभारतातील लढाईचे दाखले देऊन आमदार गायकवाडांनी धर्म वाचवायचा असेल तर कधीकधी अधर्मही करावा लागतो, असे सांगितले. चिकन, मटन खाण्याबद्दल मी जे वक्तव्य केले ते माझे अधिकृत प्रसिद्धीपत्रक नव्हते, फोनवर बोलताना झालेल्या चर्चेतून संबंधित पत्रकाराने ती बातमी केली. त्यात मी कुठेही देव, धर्माचा उल्लेख केलेला नाही. त्याची कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे असल्याचे श्री. गायकवाड म्हणाले. अर्थाचा अनर्थ करून भाजपच्या सोशल मीडिया सेलने राजकीय फायद्यासाठी या विषयाला हवा दिल्याचे श्री. गायकवाड म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार प्रतापराव जाधव यांनी मला सांगितले, की वारकरी सांप्रदाय आपला आहे. त्यामुळे या सांप्रदायाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे गायकवाड म्हणाले. मात्र जे खरे वारकरी नाहीत, संतांचे वैचारिक वारसदार नाहीत त्यांची मी माफी मागणार नाही, असेही ते म्हणाले. आपल्यासाठी हा विषय इथेच संपला असल्याचे ते म्हणाले.
खोटे गुन्हे दाखल केल्यास खबरदार...
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होऊन खोटे गुन्हे दाखल होणार असल्याची चर्चा आहे. पण राजकीय दबावातून चौकशी न करता माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला तर मी त्या अधिकाऱ्याविरुद्ध विधानसभेत हक्कभंग आणेल, असा इशाराही श्री. गायकवाड यांनी दिला.