आधी समजावून सांगा, ऐकले नाही तर कानाखाली वाजवा!; रविकांत तुपकरांच्‍या चिथावणीखोर वक्‍तव्‍याने महावितरण “शॉक्‍ड’!; तुपकरांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार, तुपकर म्‍हणाले, मी अशा तक्रारींना नाही भीक घालत!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी समजावून सांगा, ऐकले नाही तर कानाखाली वाजवा…! या रविकांत तुपकरांच्या आक्रमक अन् चिथावणीखोर वक्तव्यामुळे एरवी ग्राहकांना छोट्या छोट्या कारणांवरून “शॉक’ देणारे महावितरणच “शॉक्ड’ झाले आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे पदाधिकारी भास्कर सातव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तुपकरांविरुद्ध तक्रार दिली आहे. मात्र मी अशा तक्रारींना भीक घालत …
 
आधी समजावून सांगा, ऐकले नाही तर कानाखाली वाजवा!; रविकांत तुपकरांच्‍या चिथावणीखोर वक्‍तव्‍याने महावितरण “शॉक्‍ड’!; तुपकरांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार, तुपकर म्‍हणाले, मी अशा तक्रारींना नाही भीक घालत!

बुलडाणा (मनोज सांगळे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आधी समजावून सांगा, ऐकले नाही तर कानाखाली वाजवा…! या रविकांत तुपकरांच्‍या आक्रमक अन्‌ चिथावणीखोर वक्‍तव्‍यामुळे एरवी ग्राहकांना छोट्या छोट्या कारणांवरून “शॉक’ देणारे महावितरणच “शॉक्‍ड’ झाले आहे. महावितरणमधील कर्मचाऱ्यांच्‍या संघटनेचे पदाधिकारी भास्‍कर सातव यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तुपकरांविरुद्ध तक्रार दिली आहे. मात्र मी अशा तक्रारींना भीक घालत नाही. जे बोललो ते योग्यच बोललो, असे म्‍हणत तुपकरांनी वक्‍तव्‍यावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. त्‍यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध महावितरण असा नवा संघर्ष राज्‍यात उफाळून येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांच्‍या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेण्यात रविकांत तुपकर कायम पुढे असतात. बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दबदबा असण्याला त्‍यांचा हा आक्रमक स्वभाव आजवर कारणीभूत ठरला आहे. गेल्या आठवड्यात वाशीम जिल्हा दौऱ्यावर असताना त्‍यांनी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्‍यात वादग्रस्‍त वक्‍तव्‍य केले. थकीत बिलापोटी शेतकऱ्यांची वीज महावितरण कर्मचारी कापत आहेत. सवलत देण्याची मागणी करूनही आणि काही रक्‍कम भरण्याची तयारी दाखवूनही कर्मचारी ऐकत नसल्याच्‍या तक्रारी कार्यकर्त्यांनी श्री. तुपकरांकडे केल्या.

त्‍यावर खवळलेल्या तुपकरांनी “गावात महावितरणचे कर्मचारी वीज कापायला आले की त्यांना आधी समजवा. नाहीच ऐकले तर त्यांच्या कानाखाली वाजवा’, असे विधान केले. त्‍यांच्‍या या वक्‍तव्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्‍यामुळे वीज कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या राज्य विज वर्कर्स फेडरेशनने त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यावर आक्षेप घेतला असून, या वक्‍तव्‍यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ले वाढण्याची भीती त्‍यांना वाटू लागली आहे. त्‍यामुळेच नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी गुन्‍हा दाखल केलेला नव्‍हता. मात्र अशा तक्रारी राज्‍यभरातील पोलीस ठाण्यांत दाखल होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. महावितरण आणि “स्वाभिमानी’त उफाळलेला हा वाद पुढे काय वळणे घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रविकांत तुपकर म्‍हणतात…
मी शेतकरी, शेतमजूर आणि सामान्यांच्या हितासाठी लढतो. आजवर अशा कित्‍येक तक्रारी झाल्या. गुन्हेही दाखल झाले. त्यामुळे या तक्रारीला मी महत्त्व देत नाही. महावितरणच्या जाचाने शेतकरी त्रस्त आहेत. त्यांच्या भावना पाहता हे विधान केले असून, त्‍यावर आपण ठाम आहे, असे श्री. तुपकर यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले.