अशी होईल जिल्ह्यात त्या त्या तालुक्याची मतमोजणी… वाचा तुमच्या तालुक्यात किती असतील टेबल अन् किती होतील फेर्या; 9 हजारांवर उमेदवारांचा लागणार निकाल
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बिनविरोधमुळे 498 ग्रामपंचायतींच्या 3891 जागांसाठी मतदान झाले असून, आता उद्या 18 जानेवारीला होणार्या मतमोजणी नंतर निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 9 वाजता सुरू होणार्या या मतमोजणीसाठी 1226 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, 13 केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
बुलडाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, मोताळा, मलकापूर, नांदुरा तहसीलची मतमोजणी तहसील कार्यालयातच पार पडणार आहे. चिखलीची तालुका क्रीडा संकुलात तर जळगाव जामोदची तेथील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. सिंदखेड राजाची नगर पालिका टाऊन हॉल, देऊळगाव राजाची जुन्या नगर पालिका टाऊन हॉलमध्ये, खामगावची लोकमान्य टिळकनगर पालिका शाळा क्रमांक 6, शेगाव तालुक्याची नगर पालिका शाळा क्रमांक 5 मध्ये मतमोजणी होईल. मतदानाबरोबरच या मतमोजणीची देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे.. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 13 तहसील मिळून 777 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, इतर पूरक कामांसाठी 449 कर्मचारी लावण्यात आले आहेत. तसेच 156 टेबलवरून ईव्हीएम व पोस्टल मतदानाची गणना करण्यात येणार आहे. 13 तहसीलमधील मतदानाच्या 179 फेर्यांनंतर निकाल घोषित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, जागा व मतदार संख्या लक्षात घेऊन फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही बाब लक्षात घेता लोणार, संग्रामपूर व जळगाव जामोदमधील मोजणी व निकाल लवकर लागेल असा अंदाज आहे.