अर्थसंकल्पावर रविकांत तुपकर नाखुश!
बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा आहेत. हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहेत. या अर्थसंकल्पमुळे 80 टक्के सामान्य जनतेचा अपेक्षाभंग झाला असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेतेे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लाइव्हला दिली.
केंद्र सरकारने सिंचनासाठी 5 हजार कोटींची केलेली तरतूद अत्यल्प आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राच्या सिंचनासाठी सतरा हजार पाचशे कोटी रुपये लागतील असे एका बैठकीत सांगितले होते. जर केवळ महाराष्ट्र राज्यासाठी एवढी तरतूद लागत असेल तर संपूर्ण देशासाठी 5000 कोटी रुपयांत काय होणार, असा सवालही रविकांत तुपकर यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कृषी प्रकिया उद्योगांसाठी कोणतीही भरीव तरतूद केली नाही. इन्कम टॅक्समध्येही सामान्यांना दिलासा नाही. आरोग्यासाठी तरतूद केली असली तरी सामान्य माणसाच्या भाकरीचे काय, असा सवालही त्यांनी केला आहे. कोरोना संकटकाळानंतर केंद्राकडून या अर्थसंकल्पात सामान्य जनतेला खूप मोठी अपेक्षा होती मात्र सरकारने अपेक्षाभंग केल्याचे ते म्हणाले.