SUNDAY SPECIAL बुधवत अन् सपकाळांच्या "तुझ्या गळा माझ्या गळा"! बेरजेच्या राजकारणाची भूमिका विद्यमान आमदारांची अडचण वाढवणार..?

 
Budhvat
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "जय जगत" घोष करत राजकारणामध्ये राष्ट्रीय पातळीवर काम करणारे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यामध्ये सध्या सुरू असलेले राजकीय अंडरस्टँडिंग बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. बुधवंत आणि सपकाळ यांनी घेतलेली बेरजेच्या राजकारणाची भूमिका इथे विद्यमान आमदारांसाठी अडचणीची ठरू शकते असा सूर सध्या ग्राउंड लेव्हलला उमटत आहे...
 बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा तसा इतिहास मोठा आहे.पहिल्यांदा निवडून आलेला आमदार इथे सलग दुसऱ्यांना आमदार होत नाही. अर्थात एक टर्म सोडून (एकदा पराभव झाल्यानंतर) दुसऱ्यांदा सलग आमदार होण्याची ऐतिहासिक कामगिरीही शिवसेनेमध्ये त्यावेळी असलेले विजयराज शिंदे यांनी (२००४ आणि २००९) मध्ये केलेली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणाने घेतलेले अनेक नाट्यमय वळणाने सगळे संदर्भ बदलून गेले आहे. अर्थात दरम्यानच्या काळात कोरोना सारखी जागतिक महामारी सुद्धा लोकांनी अनुभवली. महाविकास आघाडीचे सरकार आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून काम सुरू करत नाही तोच कोरोना आला. राज्य, देश नव्हे तर अख्खे जग घरात बंदिस्त झाले अशी स्थिती होती. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे ४० आमदारांसोबतचे बंड गाजले. यात बुलडाणा जिल्हा मुख्यालयाचे आमदार संजय गायकवाड हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत "मुंबई व्हाया सुरत टू गुवाहाटी" असा प्रवास करत भाजपसोबत नव्या सत्तेत सामील झाले. त्यापुढे शिवसेनेची दोन गटात विभागणी झाल्यानंतर एकसंघ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले जालिंदर बुधवत यांनी ठाकरे निष्ठा कायम ठेवत येथे शिवसेना ठाकरे गट येथे जिवंत ठेवला. 
    दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांची विधाने राज्यभर प्रसिद्धी मिळवून गेली. त्यातच त्यांनी थेट उद्धव ठाकरे ,आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यावर केलेली तिखट विधाने शिवसेनेच्या नेत्यांच्या (ठाकरे गट ) जिव्हारी लागलेली आहेत. परिणामी बुलडाणा विधानसभा मतदारसंघावर सध्या विशेष लक्ष मातोश्रीवरून देण्यात आलेले आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसही आपला हक्क सांगत आहे. त्यात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे देखील आपला दावा ठोकून आहेत. जयश्रीताई शेळके या सुद्धा विधानसभेसाठी तयारीला लागलेल्या आहेत. असे असताना जालिंदर बुधवत यांनी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने बुलडाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये मशाल यात्रेचा जागर सुरू केलेला आहे. मोताळा तालुक्यात या यात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता जालिंदर बुधवत यांची इमेज उजळून निघालेली आहे. बुलडाणा तालुक्यात ही यात्रा काल - परवापासून सुरू झाली. या यात्रेत काँग्रेसचे नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील बुधवतांच्या सोबत सहभाग घेतला. नाही म्हटलं तरी सपकाळ यांनी आमदार संजय गायकवाड त्यांच्या कार्यप्रणालीवर टीका करत "सोशल वॉर" छेडला आहे. 
  सपकाळ यांचे शिवसेनेच्या मशाल यात्रेत सहभागी होणे ही वरवर दिसणारी ही गोष्ट साधी जरी असली तरीही राजकारणाच्या दृष्टीने "सोपी" म्हणता येणार नाही. बुधवत आणि सपकाळ या दोन्ही नेत्यांनी "तुझ्या गळा माझ्या गळा" चे सूर अळवले आहेत. महाविकास आघाडीसाठी ही जमेची बाजू म्हणता येईल. बुलडाणा निवासी असलेले अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांचे एक वक्तव्य मधल्या काळात चर्चेत आले होते. काँग्रेस येथे वरचढ असल्याने ही जागा आम्ही मागू अशी त्यांची भूमिका त्यात होती. मात्र विद्यमान पातळीवर बुधवत आणि सपकाळ यांच्यात असलेले सामंजस्य हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने बेरजेचे राजकारण करणारे असल्याचे दिसून येत आहे. बुलडाण्याची जागा कोणाला सुटेल आणि कोण लढेल? यापेक्षा एकीची वज्रमूठ कायम असणं हेच महाविकास आघाडीसाठी सध्या महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने संयमी आणि नियोजनात्मक पातळीवर शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसच्या दोन इच्छुक उमेदवारांमध्ये एकी दिसून येत आहे, हेही नसे थोडके.....!!