बुलढाणा नगर पालिकेत महिला राज; नगराध्यक्षसह सदस्यांच्या १५ जागा राखीव; प्रभागनिहाय आरक्षण जाहीर! अनेकांना बसला धक्का, इच्छुकांची उमेदवारीसाठी लगबग सुरू..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तब्बल आठ वर्षांनंतर होणाऱ्या बुलढाणा नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण ८ ऑक्टाेबर राेजी जाहीर करण्यात आले. बुलढाणा नगर पालिकेचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तसेच बुधवारी जाहीर झालेल्या आरक्षणात तब्बल १५ जागा महिला सदस्यांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेत यंदा महिला राज येणार आहे.दरम्यान, पालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेकांना त्यांची जागा महिलांसाठी राखीव झाल्याने धक्का बसला आहे. 
उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नगर परिषदेच्या १५ प्रभागांमधील ३० सदस्यांसाठी लॉटरी पद्धतीने आरक्षण जाहीर करण्यात आले. यात ५ सदस्यपदे अनुसूचित जातीसाठी, तर ८ सदस्यपदे इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. उर्वरित जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहणार आहेत.
अलीकडेच नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी घोषित झाल्याने अनेक राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवारांच्या अपेक्षांवर पाणी फिरले होते. त्यातच आता सदस्यपदांच्या आरक्षणामुळे राजकीय समीकरणात नवे बदल दिसण्याची शक्यता आहे.
नगर परिषद प्रशासनाने अंतिम प्रभाग संरचनेचे आराखडे सार्वजनिक केल्यानंतर आरक्षणाबाबत सर्वच स्तरावर उत्सुकता होती. राज्य शासनाने मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतींसाठी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित केले असून, त्यानंतर स्थानिक पातळीवर सदस्य आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
प्रभागनिहाय आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक आरक्षण प्रवर्ग
1 अनुसूचित जाति – सर्वसाधारण महिला
2 ओबीसी – सर्वसाधारण महिला
3 ओबीसी महिला – सर्वसाधारण
4 ओबीसी – सर्वसाधारण महिला
5 अनुसूचित जाति महिला – सर्वसाधारण
6 अनुसूचित जाति महिला – सर्वसाधारण
7 अनुसूचित जाति महिला – सर्वसाधारण
8 ओबीसी महिला – सर्वसाधारण
9 अनुसूचित जाति – सर्वसाधारण महिला
10 सर्वसाधारण महिला – सर्वसाधारण
11 ओबीसी – सर्वसाधारण महिला
12 ओबीसी – सर्वसाधारण महिला
13 अनुसूचित जाति महिला – सर्वसाधारण
14 ओबीसी महिला – सर्वसाधारण
15 ओबीसी महिला – सर्वसाधारण