EXCLUSIVE "झेडपी" आणि "नपा" च्या निवडणुका महायुती खरच एकत्रित लढणार की वेगळवेगळ्या? जागावाटप करतांना होणार नेत्यांची कसरत! "तिसऱ्या भिडू" मुळे प्रॉब्लेम? भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात.....
May 8, 2025, 10:41 IST
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. ३–४ वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आता लोकप्रतिनिधींच्या ताब्यात येणार आहेत. ४ महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता इच्छुकांच्या तयारीला वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारी करत आहेत.. राज्य पातळीवर महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन प्रमुख आघाड्या आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती एकत्रित लढणार का? की घटक पक्ष वेगवेगळे लढून नंतर सत्ता स्थापनेसाठी एकत्र येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महायुती एकत्रित लढेल असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असले तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर त्या त्या कार्यकर्त्यांना अधिकार दिल्या जातील असेही ते म्हणाले होते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्रित लढणे कितपत शक्य आहे याची चाचपणी आता सुरू झाली आहे.
भाजपा आणि शिवसेनेने याआधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढल्या आहेत. मात्र यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या रूपाने महायुतीत तिसरा भिडू असल्याने जागा वाटप करतांना प्रचंड कसरत होणार आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने आपला "कार्यकर्ता" नाराज होऊ नये यासाठी सगळेच पक्ष प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे प्रसंगी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती देखील होऊ शकतात. बुलडाणा शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार केला तर इथे भाजपा आणि शिवसेनेत पाहिजे तेवढे चांगले संबंध नाहीत. त्यामुळे नगरपरिषद निवडणुकीत जागावाटप करतांना खटके उडण्याचीच जास्त शक्यता आहे. भाजपमध्येही योगेंद्र गोडे की विजयराज शिंदे, नेतृत्व कुणाचे? असा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. योगेंद्र गोडे एकवेळा आ.गायकवाड यांच्याशी जुळवूनही घेतील पण विजयराज शिंदे आणि आ.गायकवाड यांच्यातला सत्तासंघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील पहायला मिळणार आहे. मेहकर ,लोणार तालुक्यात भाजपला नेहमीच दुय्यम वागणूक मिळाल्याचा आरोप तिथले स्थानिक नेते नेहमी करत असतात, आता त्याचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील उमटू शकतात. एकंदरीत महायुतीला एकत्रित लढतांना नेत्यांची प्रचंड कसरत होणार आहे...
भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात,
यासंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ . गणेश मांटे म्हणाले की,सध्या आम्ही महायुती म्हणून चांगले काम करतो आहे. राज्यातले महायुती सरकार लोकांचे सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुती म्हणून एकत्रित लढलो तर त्याचा निश्चित फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था या विकासाच्या धमन्या आहेत. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढून सत्ता स्थापन करणे आमचे लक्ष आहे. जेणेकरून विकासाचा प्रवाह या धमण्यांमधून आणखी वेगाने वाढेल...