मेहकर विधानसभेत ऋतुजा चव्हाण हवा फिरविणार? गावोगावी मिळतोय उदंड प्रतिसाद! स्थानिक उमेदवार असल्याने ठरतेय जमेची बाजू! महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस पथ्यावर पडणार....

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मेहकर विधानसभेची निवडणूक यंदा चांगलीच गाजत आहे. प्रस्थापितांची ३० वर्षे विरुद्ध जनसामान्यांच्या उमेदवार म्हणून समोर येत असलेल्या ऋतुजा चव्हाण यांची कोरी पाटी असा हा संघर्ष मतदारसंघात पहायला मिळण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडे प्रबळ उमेदवार नसणे, जे आहेत ते स्थानिक नसणे आणि अंतर्गत कलह यामुळे डॉ.ऋतुजा चव्हाण विरुद्ध आ.डॉ.संजय रायमुलकर असेच एकंदरीत चित्र आजघडीला आहे..स्थानिक उमेदवार असणे आणि तळागाळातला संपर्क ह्या डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्यासाठीच्या जमेच्या बाजू ठरत आहेत...
  गेल्या ३० वर्षांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर ना.प्रतापराव जाधव यांचा एकछत्री अंमल आहे. मतदारसंघ राखीव झाल्यावर आ.डॉ.संजय रायमुलकर यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले. या निवडणुकीत प्रस्थापित विरोधी लाटेचा सामना आ. रायमुलकर यांना करावा लागू शकतो. मात्र महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांना मात्र ही परिस्थिती पाहिजे तेवढी अनुकूल बनवता आलेली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आ. रायमुलकर यांच्यासारख्या मुरब्बी राजकारण्याला आव्हान देण्यासाठी डॉ.ऋतुजा चव्हाण ह्याच हुकमाचा एक्का ठरू शकतात अशी चर्चा आता गावोगावच्या कट्ट्यावर सुरू झाली आहे..
 महाविकास आघाडीतील गोंधळ चव्हाण यांच्या पथ्यावर...
सध्या जिल्ह्यातील इतर मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे चित्र रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र मेहकरात महाविकास आघाडीत अंतर्गत धुसफूस आहे.. उबाठा शिवसेनेकडून डझनभर उमेदवारी इच्छुक आहेत.काँग्रेसही हा मतदारसंघ आपल्याकडे मागत आहे. दुसरीकडे उबाठाच्या एका गटाकडून ज्या उमेदवाराचे नाव पुढे करण्यात येत आहे त्यांना मतदारसंघातील गावे माहीत नाहीत, गल्ल्या माहीत नाहीत अशीही चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी आहे. दुसरीकडे ऋषांक चव्हाण, डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी शेतकरी चळवळीत केलेले काम, लोकसभा निवडणुकीत मेहकर विधानसभेत तब्बल ५५ हजार मते घेणाऱ्या रविकांत तुपकरांची साथ, स्थानिक शेतकरी चळवळीती कार्यकर्त्यांचे संघटन, वेगवेगळ्या पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांशी स्नेहाचे संबंध या बाबी डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पथ्यावर पडणार आहेत...