EXCLUSIVE जिल्ह्यातून लागेल का कुणाचा नंबर? विधान परिषदेतील ९ आमदारांचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार; विजयराज शिंदे, संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकरांकडून फिल्डिंग...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्याचे राजकारण सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे आपसात जमत नाही. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड भाजपच्या गड असलेल्या चिखलीत पक्ष वाढवण्यासाठी जोमाने भिडले आहेत, हे करतांना मित्र पक्षाच्या सहकारी आमदारांवरही ते अगदी खालच्या भाषेत घसरले.. अर्थात चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी अगदी संयत शब्दात यावर प्रतिक्रिया दिली. हा सगळा वाद-विवादाचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे तिघांनी आमदारकीसाठी आता फिल्डिंग लावली आहे.. या तिघांपैकी एखाद्याचा नंबर लागतो की जिल्ह्याच्या वाट्याला भोपळाच येतो हे एप्रिल अखेरीपर्यंत कळणार आहे. ज्या ३ तीन नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यापैकी १ भाजपचे तर २ नावे शिंदे यांच्या शिवसेनेची आहेत. मे महिन्यात विधान परिषदेच्या ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे, काल २४ मार्चलाच या आमदारांना विधान भवनात निरोपही देण्यात आला..आता या ९ जागांवर कुणाला संधी मिळणार यावर आता पुढच्या महिनाभरात मंथन होणार आहे.

 उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिंदेंच्या सेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे संदीप जोशी, दादाराव केचे, रणजीत सिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर या आमदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी नव्याने निवडणूक होणार आहे.
आमदारांच्या कोट्यातून म्हणजेच विधानसभा सदस्यांद्वारे या ९ आमदारांची निवड होणार आहे. विधानसभेतील सध्याचे महायुतीचे संख्याबळ पाहता ९ पैकी जवळपास ८ आमदार महायुतीचे निवडून येतील. यातील ५ जागा भाजपच्या, २ शिंदेसेनेच्या तर १ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाऊ शकते. महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षांतून केवळ १ आमदार निवडून येऊ शकतो अशी स्थिती आहे. त्यामुळे या "आयत्या" आमदारकीवर अनेकांचा डोळा आहे. तिथे वर्णी लागावी यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे. 
  कार्यकाळ संपत असलेले विधान परिषदेचे भाजप आमदार संदीप जोशी यांनी याआधीच आपल्याला पुन्हा संधी नको अशी भूमिका स्वतः जाहीर केली आहे. दादाराव केचे, रणजीतसिंह मोहिते पाटील आणि संजय केनेकर या तिघांपैकी कुणाला पुन्हा संधी मिळते? की पूर्ण नवी टीम उभी केली जाते यावर बऱ्याच इच्छुकांचे गणित अवलंबून असणार आहे.
निवृत्त होत असलेल्या भाजपच्या चार आमदारांपैकी दोघे विदर्भाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या जागेवर पुन्हा विदर्भातून दोघांना संधी मिळू शकते. बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष, सभागृहाच्या कामकाजाचा अनुभव असलेले अनुभवी नेते विजयराज शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन यामाध्यमातून होऊ शकते..अर्थात पक्षश्रेष्ठींच्या मनात आले तर...!
 रायमुलकरांना दिला होता शिंदेंनी शब्द..!
 २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मेहकर चे आमदार संजय रायमुलकर यांचा अनपेक्षित पराभव झाला होता. या पराभवानंतर एकनाथ शिंदे यांनी स्वतः रायमुलकरांना फोन करत "चिंता करू नको तुला विधान परिषदेवर घेतो" असा शब्द दिला होता. त्यामुळे संजय रायमुलकर या शब्दाची आठवण एकनाथ शिंदेंना करून देत असतीलच.त्यामुळे एकनाथ शिंदेंनी शब्द पाळालाच तर संजय रायमुलकरांच्या रूपाने जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळू शकतो.
सिंदखेड राजाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर २०१९ पासून निर्वासितांसारखे जगणे जगत आहेत..आता त्यांच्या समर्थकांकडून थेट " शशिकांत खेडेकर भावी खासदार" असे कॅम्पेनिंग केल्या जात आहे.खासदार प्रतापराव जाधव आणि शशिकांत खेडेकर यांच्यातील हे शीतयुद्ध थांबवण्यासाठी किंवा भविष्यातील अडचण टाळण्यासाठी स्वतः ना.जाधव शशिकांत खेडेकरांची शिफारस एकनाथ शिंदेंकडे करू शकतात.. असे एकंदरीत चित्र असल्याने जिल्ह्यातील एखाद्याचा नंबर विधान परिषदेवर लागतो की काय? पाहुया पुढे काय काय होते..