मेहकर विधानसभा मतदारसंघात समीकरणे बदलणार? डॉ.ऋतुजा चव्हाण यांना मिळतेय जनतेची पसंती;
डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या, मतदारसंघाला विकासापासून कोसो दूर ठेवण्याचे पाप प्रस्थापितांनी केले....
Updated: Oct 11, 2024, 10:06 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षे ह्यांच्या हाती सत्ता होती..साधे साधे प्रश्नही यांना मार्गी लावता आले नाही.. मेहकरच्या तरुणांना उद्योग धंद्यांसाठी पुण्या - मुंबईला जावे लागते, यांना एक एमआयडीसी आणता आला नाही..केवळ खुर्च्या उबवण्याचे काम त्यांनी केले..३० वर्षांत मतदारसंघाला पुढे आणण्याऐवजी ५० वर्षे मागे नेण्याचे पाप त्यांनी केले..त्यामुळे सामान्य जनतेचा तळतळाट त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेची संधी मिळाल्यास ५० वर्षे मागे गेलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघाला पुढे आणण्यासाठी जीवाचे रान करीन असा शब्द डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी दिला. काल, १० ऑक्टोबरला डोणगाव येथील कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या..
जनतेच्या आग्रहास्तव आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन, आरोग्य, शिक्षण, दळणवळण, उद्योग या सर्वच क्षेत्रात मेहकर विधानसभा मतदारसंघाची स्थिती चांगली नाही. सत्ताधाऱ्यांनी स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाचा विकास करून घेतला मात्र जनतेला वाऱ्यावर सोडले असेही त्या म्हणाल्या. त्यामुळेच आता मतदारसंघातील जनतेने परिवर्तनाचा निर्धार केला आहे. गावोगावी आम्ही जातो तेव्हा जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे, लोक बोलतात, व्यक्त होतात..त्यांना आता पुन्हा तेच ते नको आहे असे डॉ.ऋतुजा चव्हाण यावेळी म्हणाल्या.
पक्षाचे काय?
दरम्यान यावेळी तुम्ही कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी डॉ.ऋतुजा चव्हाण यांना केला असता त्या म्हणाल्या की, मी निवडणूक लढवावी हे लोकांनी ठरवले आहे. त्यामुळे निवडणूक कशी लढवायची,कोणत्या पक्षाकडून लढवायची याची फिकीर मी करत नाही,जनता जनार्दन हाच आपला पक्ष आहे असे डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या....
समीकरणे बदलणार?
मेहकर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत एकदाही महिला उमेदवाराने प्रतिनिधित्व केले नाही. आधीची १५ वर्षे ना.प्रतापराव जाधव आणि अलीकडची १५ वर्षे आ. रायमुलकर यांच्या रूपाने गत ३० वर्षांपासून सत्ता एकाच गटाकडे आहे. त्यामुळे मतदारसंघात प्रस्थापित विरोधी लाट आहे. महाविकास आघाडीकडून मतदार संघ उबाठा शिवसेनेलाच सुटेल अशी चिन्हे आहेत. मात्र विरोधक म्हणून उबाठा शिवसेनेकडे तेवढ्या ताकदीचा उमेदवार नाही, ज्या उमेदवारांची चर्चा आहे ते मतदारसंघातील नसल्याने उबाठा शिवसेनेचा एक गट नाराज आहे. डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे ,त्यांच्या पतीचे उबाठा शिवसेनेसह महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत.त्यामुळे महाविकास आघाडीतील गटातटाचा फायदा देखील डॉ.ऋतुजा चव्हाण यांच्या पथ्यावर पडून मतदारसंघाची समीकरणे बदलणार असल्याची चर्चा संबंध मतदारसंघांत सुरू आहे...