POLITICAL SPECIAL "प्रतापगडा"त महाविकास आघाडीचा भिडू कोण?. ठाकरे शिवसेनेकडून सिद्धार्थ खरात यांच्यासह इच्छुकांची गर्दी!त्यांचं जमणार की काँग्रेसला सुटणार..?

 
Rajkaran
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शारंगधरनगरी बालाजी नगरी म्हणून ख्यातीकिर्त व जागतिक दर्जाचा ठेवा असलेल्या लोणार सरोवराचा समावेश असलेला मेहकर विधानसभा मतदारसंघ तीन दशकापासून "प्रतापगड" या नावानेच ओळखला जातो. अर्थात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची व त्यांचे मानसपुत्र असलेले डॉ.संजय रायमुलकर यांची या भागावर असलेली पकड विधानसभेमध्ये कायम लक्षात येते. शिवसेना दोन गटांमध्ये विभागल्या गेल्यानंतर आता ठाकरे शिवसेनेकडून कोण लढणार या चर्चांनी वेग घेतला आहे. दुसरीकडे काँग्रेसही ही जागा पुन्हा एकदा आपल्याला लढायची असल्याचे सांगत जोर लावून आहे. 
 ९० च्या दशकाचा तो सत्ता परिवर्तनाच्या दिशेने जाणारा आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांचा काळ होता. खऱ्या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यामध्ये धर्मवीर म्हणून ज्यांना ओळख मिळाली ते स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत तो मेहकर भागामध्ये तळागळात नेला. त्यांच्याच नेतृत्वात विद्यमान केंद्रीय मंत्री खा. प्रतापराव जाधव यांना बाळकडू मिळाले.
    १९९० ला प्रतापराव जाधव यांचा विधानसभेमध्ये पराभव झाला आणि दरम्यान रहाटे यांच्या अकाली जाण्याने मोठी पोकळी शिवसेनेमध्ये निर्माण झाली. आपसूकच प्रतापराव जाधव यांच्यावर नेतृत्वाची जबाबदारी आली. शेतीमातीशी असलेली नाळ ग्रामीण राजकारणावर अधिक घट्ट करत प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सहकारी सोसायटी, खरेदी-विक्री संघ व बाजार समितीमध्ये शिवसैनिकांना सत्तापदे दिली. त्याकाळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या व राजकारणामध्ये 'गारुडी" म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा सुबोध सावजी यांचा १९९५ ला पराभव केला. खुद्द बाळासाहेबांनीच तयार केलेल्या नियमावलीत बसत नसतानाही "व्हाया मातोश्री टू मंत्रालय" असे पहिल्या टर्ममध्ये निवडून आलेले असतानाही त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले.नंतर जाधव यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही 
 १९९५,१९९९,२००४ अशी सलग तीन टर्म ते आमदार राहिले. निवडणूक आयोगाने मतदार संघाची पुनर्रचना केल्यानंतर मेहकर हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि बुलडाणा लोकसभा खुला झाला त्यामुळे आमदार जाधव पुढे खासदारही झाले आणि पुढचा इतिहास आपल्याला ठाऊकच आहे. दरम्यान २००९ मध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉ. संजय रायमुलकर यांनी प्रतापगडाचा शिलेदार म्हणून आपला झेंडा रोवला आणि विजयाची हॅट्रिक देखील पूर्ण केली. मात्र महाविकास आघाडीच्या सरकार अर्थात खुद्द उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या विरोधात बंड करणाऱ्या आमदारांमध्ये मेहकर विधानसभा मतदारसंघाचे डॉ. संजय रायमुलकर यांचा पहिला फळीत समावेश होता. ते देखील सुरत व्हाया गुवाहाटी गेले आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले. दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली. 
  स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे चिरंजीव आशिष रहाटे यांनी ठाकरे यांची साथ देत संघटनात्मक बांधणी करत प्रतापगडाला आव्हान दिले. मात्र हा मतदारसंघ राखीव असल्याने त्यांची सध्या तरी गोची आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. दुसरी निवडणूक तोंडावर येऊन ठेवली आहे. त्यामुळे प्रतापगड असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कोण भिडू मैदानात उतरणार? हा खरा प्रश्न चर्चिला जात आहे. अलीकडेच "बुलडाणा लाइव्ह" ने केलेल्या संकेताप्रमाणे शासनाचे वरिष्ठ अधिकारी असलेले सिद्धार्थ खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवबंधन बांधले. त्या मागची त्यांची भूमिका लपून राहिलेली नाही. मेहकर विधानसभा संघात निवडणूक लढवण्यासाठी एबी फॉर्म मिळणारच या खात्रीने खरात यांनी घेतलेला हा निर्णय म्हणावा लागेल. तर दुसरीकडे संघटनात्मक दृष्ट्या काम करत असलेले डॉ.गोपाल बच्छिरे नुकतेच पुन्हा शिवबंधन बांधलेले सरदार अशी शिवसेनेकडून इच्छुक असलेली यादी मोठी आहे. काँग्रेसकडून देखील हा मतदार संघ महाविकास आघाडीमध्ये आपल्याला सुटावा म्हणून ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, ॲड. अनंत वानखेडे, चित्रांगण खंडारे व अन्य इच्छुक देखील आहेत. अपक्ष इच्छुकांची संख्या सुद्धा मोठी आहे. विद्यमान आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या लोकप्रियतेसमोर टिकणारा आणि विकास व्हिजन असलेला उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागेल एवढे मात्र निश्चित....