जळगाव जामोद नगरपालिकेची हद्दवाढ कधी? आ. डॉ. संजय कुटे पाठपुरावा करण्यात कमी?
Feb 22, 2025, 08:35 IST
जळगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०१५ पासून जळगाव जामोद नगरपालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. नगरपालिकेवर सध्या प्रशासक राज आहे, दरम्यान आमदार संजय कुटे पाठपुरावा करण्यात कमी पडले की काय? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय यंत्रणेवर सध्या चालना मिळाली असली तरी हद्द वाढीवर अंतिम शिक्कामोर्तब कधी? असा सवाल ऐरणीवर आला आहे...
जळगाव जामोद जळगाव जामोदच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सन २०१५ पासून प्रलंबित होता. शहरालगत असलेल्या तेरा खेलीसह असलेल्या नगर पालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावास नुकतीच चालना मिळाली असून त्रुटी पूर्तीनंतर आता हद्दवाढ दृष्टीक्षेपात दिसत आहे. हद्दवाढ झाल्यास पालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढणार असून नागरिकांना सोई सुविधा मिळणार आहेत. जळगाव जामोद शहरात 'क' वर्ग नगरपालिका अस्तित्वात आहे. सद्यस्थितीत पालिकेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. सन २०१५मध्ये खेल बारी, खेल माळी, खेल मूर्तिजापूर, जळगाव जामोद खुर्द, खेल खासा खुर्द, खेल खासा बुद्रुक, खेल अमानत, खेल चतारी खुर्द, खेल चतारी बुद्रुक, वाडी खुर्द, खेल सोनजी, खेल गोबजी, खेल फूट या १३ खेलीसह पालिका हद्दवाढीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आला होता. सन २०१५ मध्ये याबाबत पहिली अधिसूचना निघाली होत. तर सन २०१९ पहिली अधिसूचना रद्द करण्यात येऊन प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देत सुधारित प्रस्ताव मागविण्यात आला होता. याबाबत पालिका प्रशासनाने कारवाई करत सुधारित प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, नवीन ठाराव आवश्यक असल्याने तो स्वीकारण्यात आला नाही. सध्यस्थीतीत ह्या प्रस्तावास चालना मिळाल्याने हद्दवाढीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एकंदरीत हद्दवाढमध्ये नानाविध अडचणी प्रशासकीय अधिकारी आणत असल्यामुळे जळगाव जामोद पालिका हद्दवाढीचा प्रस्तावाचा पाठपुरावा आता स्वतः आ.डॉ संजय कुटे यांनी करण्याची गरज निर्माण झाली आहे मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केल्यास हद्दवाढ तत्काळ होऊ शकते...