

क्या बात..!बुलढाणा, चिखली कडून समृद्धी महामार्गावर पोहोचण्यासाठी दहा किमी फेरा होणार कमी! आ. धिरज लिंगाडे यांची अभ्यासपूर्ण मागणी! एमएसआरडीसीकडून दोन पर्यायांची सकारात्मक पडताळणी
Apr 4, 2025, 17:50 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): उपराजधानी ते राजधानी अर्थात नागपूर - मुंबई असलेला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर बुलढाणा व चिखली भागातून मेहकर नजिक प्रवेश करण्यासह बाहेर पडण्याकरिता दहा ते बारा किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो. शिवाय मेहकर शहरातील रहदारीचा देखील अडथळा निर्माण होतो. यासाठी अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरजभाऊ लिंगाडे यांनी राज्य सरकारकडे अभ्यासपूर्ण मागणी केली होती. या संदर्भात नवीन पोच मार्ग तयार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) दोन पर्यायांवर सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. त्या संदर्भाचे पत्र देखील आमदार धीरज लिंगाडे यांना प्राप्त झाले आहे.
बुलढाणा व चिखली या भागातून समृद्धीकडे जाण्यासाठी चिखली ते मेहकर या राष्ट्रीय महामार्ग ( ५४४ सी सी) वापर करतात. तर समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हिवरा आश्रम, नागझरी, कल्याण फाटा व पुढे मेहकर गावातून जाऊन मेहकर ते मालेगाव रस्त्यावर वरून मेहकर - खामगाव असा राष्ट्रीय महामार्ग ( ५४८ सी) कडे जात या रस्त्यावरून समृद्धी महामार्गावर इंटरचेंज ( आयसी ११) पोचता येते. या रस्त्यावरून जावं लागत असताना अंदाजे १० किलोमीटरचा फेरा पडतो आणि ३० ते ४० मिनिटांचा वेळ देखील शिल्लक जातो. या संदर्भात अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व राज्य सरकारकडे पत्ररूपी पाठपुरावा करून नवीन पोच रस्त्याची मागणी केली होती. यासाठी पर्याय देखील सुचवला होता. यामध्ये मेहकर रोडवरील कल्याण फाटा येथून समृद्धी महामार्गावर प्रवेश करण्याकरता व बाहेर पडण्याकरिता नवीन मार्ग तयार करण्याची मागणी नोंदवण्यात आली होती.
दरम्यान एमएसआरडीसी च्या वतीने दोन पर्यायासाठी सकारात्मक हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भातचा अहवाल हा दृतगती महामार्गाचे शिबिर कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून एमएसआरडीसी चे मुंबई स्थित कार्यकारी अभियंता (नोडल) यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. यामध्ये पर्याय क्रमांक १ यात चिखली कडून येताना नागझरी गावठाण ते कल्याण गावातून पुढे गौंढाळा गावाजवळ ( खामगाव - मेहकर) रस्त्यापर्यंत जोडणे व तेथून १.८ की मी अंतरावरून समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज गाठणे. यामध्ये कल्याना गावातील रस्ता अरुंद असल्याने १.२० किमी चा लांबीचा वळण रस्ता भूसंपादन करणे आवश्यक असल्याची नोंद देखील घेण्यात आली आहे. ( अपेक्षित खर्च ८१.९० कोटी) तर पर्याय क्रमांक २ मध्ये कल्याण गावातून पुढे गौंढाळा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग खामगाव - मेहकर रस्त्यापर्यंत जोडणे व तेथून पुढे पुन्हा समृद्धीचा इंटरचेंज गाठणे सुचवण्यात आला आहे. यातही कल्याना गावातील अरुंद रस्त्याचा मुद्दा आणि भूसंपादनाच्या बाबी अहवालात आलेल्या आहेत.
( अपेक्षित खर्च ५३.१० कोटी) बुलढाणा व चिखली भागातून समृद्धी महामार्गावर पोहोचणाऱ्यांसाठी हा नवीन मार्ग तयार झाल्यास मेहकर शहर वगळून अंदाजे १० किलोमीटरचा फेरा कमी करता येऊ शकतो. त्यामुळे मेहकर शहराच्या मुख्य रस्त्यावरून वर्दळ रहदारीमुळे ३० ते ४० मिनिटांचा अधिकचा जाणारा अधिकचा वेळ देखील वाचता येऊ शकतो.उपरोक्त दोन्ही रस्ते हे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गाच्या दर्जाच्या असल्याने त्यांची दर्जाउन्नती करूनच पुढील काम करावे लागणार असल्याचा अहवाल एमएसआरडीसी ने सादर केला आहे. हा मार्ग झाल्यास समृद्धी महामार्गावर पोहोचण्यासाठी बुलढाणा, चिखली भागातून येणाऱ्यांना वेळेची बचत साधता येणे शक्य होणार असल्याची माहिती आमदार लींगाडे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे..