EXCLUSIVE डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या मनात काय? २८ जूनला होणार भविष्याची प्लॅनिंग..... सिंदखेडराजा मतदारसंघातील झेडपी गटांवर होणार चर्चा...
Jun 26, 2025, 10:04 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा अभेद्य गड असलेला सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र ढासळला. हा पराभव शिंगणे समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला..अर्थात ते स्वाभाविकही होते..उभ्या राजकीय कारकिर्दीत डॉ.शिंगणे यांना सिंदखेडराजा मतदारसंघात पराभव पहावा लागला नव्हता..२०२४ च्या निवडणुकीत तर महायुतीकडून दोन उमेदवार होते.महायुतीच्या मतांचे विभाजन होईल आणि डॉ.शिंगणे यांचाच विजय होईल असा ठाम विश्वास शिंगणे समर्थकांना होता...मात्र झालं उलटच...नवख्या मनोज कायंदे यांच्या सामाजिक समीकरणाची गणित फिक्स बसली अन् डॉ.शिंगणे, डॉ.खेडेकर या दिग्गजांचा धक्कादायक पराभव झाला... हा झाला इतिहास..मात्र आता किती दिवस याच पराभवाला कवटाळून बसायचं? भविष्याची पेरणी करावीच लागेल की... त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.शिंगणे आता पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. येत्या २८ जूनला ,शनिवारी सिंदखेडराजात डॉ.शिंगणे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे..
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांवर डॉ.शिंगणे यांनी लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. कार्यकर्त्यांना जपणारा, कार्यकर्त्यांना मोठं करणारा नेता म्हणून डॉ.शिंगणे यांची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांचे हात बळकट करण्याची संधी डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आहे. त्या हेतूनेच २८ जूनला डॉ. शिंगणे यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक बोलावली आहे. या आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषद पंचायत समिती भुषवलेले पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, बूथ प्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांना निरोप पाठवले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एवढी मोठी आढावा बैठक होत असल्याने या बैठकीत पराभवाच्या कारणमीमांसेसह भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची बांधणी करण्याच्या उद्देशाने देखील चर्चा होणार आहे..