१०० दिवसांत काय-काय केलं? ना. प्रतापराव जाधवांनी सांगितलं....! मेडिकल कॉलेजचे श्रेय कुणाचे? विचारल्यावर म्हणाले

 
मेडिकल

 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या १०० दिवसांत केंद्रित मंत्री या नात्याने केलेल्या कामांची माहिती आज ना. प्रतापराव जाधव यांनी दिली. त्यासाठी बुलडाणा येथील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. "मागच्या १०० दिवसांत आयुष मंत्रालयाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले. नव्या मेडिकल कॉलेजला मान्यता दिल्या. देशात १० ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा सुरू होत आहे अशी माहिती यावेळी ना जाधव यांनी दिली.

पुढे  बोलतांना ना.जाधव म्हणाले की, आधी आयुर्वेदिक औषधी सहज उपलब्ध होत नव्हती मात्र आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आयुष औषधी केंद्र आम्ही सुरू करत आहोत.इथे विविध उपचार पद्धतींची औषधे मिळतील. जिल्हा रुग्णालयात आता अमृत स्टोअर सुरू करून तिथे उच्च दर्जाची औषधे सवलतीच्या दलात मिळणार असल्याचेही ना. जाधव म्हणाले. धनत्रयोदशी चे महत्व अनेकांना माहीत नाही. धनत्रयोदशीला प्रत्येक घरी धन्वंतरीची पूजा करून आरोग्यदायी जीवनाची प्रार्थना करावी अशी अपेक्षा देखील ना जाधव यांनी व्यक्त केली. गेल्या १० वर्षात २२ एम्स रुग्णालये देशात उभे राहिलेत. २०१४ पूर्वी देशात ३८७ मेडिकल कॉलेज होते आता ती संख्या ७७४ झाली. आधी देशभरात मेडिकलच्या जागा ५१ हजार होत्या, आता त्यात वाढ होऊन ११५८१२ अधिक ८०० एवढ्या मेडिकल जागा आता निर्माण झाल्या आहेत असेही ना.जाधव म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण आरोग्य केंद्र इथेही आता अनेक सुविधा निर्माण होत आहेत असेही ना.जाधव म्हणाले.
मेडिकल कॉलेजचे श्रेय कुणाचे?
दरम्यान यावेळी बुलडाणा येथे नव्याने सुरू होत असलेल्या मेडिकल कॉलेजचे श्रेय कुणाचे असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता ना.जाधव म्हणाले की, सगळ्यांनी प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, कुणी विरोध केला नाही त्यामुळे ही काही श्रेयवादाची लढाई नाही असे ना.जाधव म्हणाले. खामगाव जालना मार्गाचा विषय सुद्धा पुढे गेला आहे. रेल्वे बोर्डाकडून हा विषय आता नीती आयोगाकडे जाईल आणि त्यानंतर हा विषय केंद्रिय कॅबिनेट पुढे जाईल असे ना.जाधव म्हणाले.