बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वव्यापी- सर्वस्पर्शी विकास करणार! प्रेमलता सोनोनेंचा मतदारांना शब्द; गावभेट गौऱ्यांना मिळतोय उदंड प्रतिसाद..

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे ध्येय आहे. आता जे काही करायचे आहे ते इथल्या मातीसाठी करायचे आहे इथल्या लोकांसाठी करायचे आहे हे मी ठरवले आहे.. विकासाच्या योजनेचा लाभ तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांना झाला पाहिजे, त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतात.. बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच जर लाभ मिळत असेल त्याला विकास म्हणत नाही.. गेल्या ५ वर्षात बुलडाणा मतदार संघाची ओळख काही चांगली झाली नाही असे म्हणत मतदारसंघाच्या सर्वव्यापी-सर्वस्पर्शी विकासासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवार सौ.प्रेमलता सोनोने यांनी दिला आहे. काल,१२ नोव्हेंबरला हणवतखेड, नांद्रा कोळी , सागवन या गावातील गाव भेट दौऱ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

 बुलडाणा हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. स्वतःला लाडक्या बहिणीचे भाऊ म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी इथे महिलेला उमेदवारी द्यावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली होती..मात्र लाडक्या बहिणीचे त्यांचे ढोंग नौटंकी आहे की काय? असा सवालही प्रेमलता सोनोने यांनी केला. दुसऱ्या बाजूला साक्षात शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील स्वराज्य पक्षाने आपल्या कामाची दखल घेत उमेदवारी दिली ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे असेही प्रेमलता सोनोने म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ असलेल्या बुलडाण्याने आता स्वराज्य पक्षाला संधी द्यावी अशी विनंती ही प्रेमलता सोनोने यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या १८ पगड जातींचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असेही त्या म्हणाल्या...