जलसंवर्धनाचा जनयज्ञ चिखलीत; आमदार श्वेताताई म्हणाल्या,‘जल संरक्षण हीच खरी शिवपूजा...
Apr 26, 2026, 09:43 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा-२०२६’ अंतर्गत ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा’ अभियानाचा भाग म्हणून चिखली येथे पैनगंगा नदीचे जलपूजन व कलश पूजन उत्साहात पार पडले. आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जलयात्रेला प्रारंभ होत असतानाच चिखलीतही त्याच मुहूर्तावर जलपूजन करण्यात आले. हा जलसंवर्धनाचा राज्यव्यापी संकल्प असल्याचे आ. महाले यांनी सांगत “जल संरक्षण हीच खरी शिवपूजा” असा संदेश दिला.
यावेळी त्यांनी विदर्भातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित करत वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली. या प्रकल्पामुळे पाच जिल्ह्यांतील शेतीला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, जलपूजन नदीकाठावर न घेता अन्य ठिकाणी झाल्याबद्दल आ. महाले यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक शब्दांत टीका केली. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी तहसील कार्यालयात ‘जनता दरबार’ घेण्याची घोषणा केली.
कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. जलसंवर्धनाचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता घोषणांनी झाली.