मतदारांनी कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे! जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांचे आवाहन; मतदानासाठी "हे" १२ ओळखपत्र ग्राह्य....
Updated: Nov 17, 2024, 16:10 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदारांनी कोणत्याही प्रकारच्या आमिष, दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यातील मलकापूर, बुलढाणा, मेहकर, सिंदखेड राजा, खामगांव, चिखली आणि जळगांव जामोद या सातही विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे.या निवडणुकीच्या काळात मतदारांना विविध प्रकाराचे आमिष, दबाव टाकण्याचे प्रकार उघडकीस येतात. निवडणूक काळात मतदारांना कोणत्याही प्रकारचे आमिष, दबाव टाकले जात असल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे आणि कोणत्याही आमिष, दबावाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे.
भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या तक्रारींसाठी सीव्हिजील ॲप उपलब्ध केले असून त्यावरही तक्रार करता येणार आहे. तसेच जिल्ह्यात आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवरील कारवाईसाठी भरारी पथक, स्थिर सर्वेक्षण पथके, पोलीस प्रशासन, आयकर विभाग आणि जीएसटी विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहेत. मतदारांनी आचारसंहितेच्या उल्लंघनाविषयीच्या घटना या पथकांच्या निदर्शनास आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदान केंद्रात मोबाईलवर बंदी...
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोबाईलवर बंदी राहणार आहे. मतदान केंद्रात मतदारांनी मोबाईल व इतर ईलेक्ट्रॅानिक वस्तू आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदानासाठी चार व्यक्तींना प्रवेश...
मतदान केंद्रावरील गर्दी, रांग कमी करण्यासाठी एकावेळी चार जणांना मतदानासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
मतदान केंद्रात विविध सुविधा...
मतदान केंद्रावर मतदारांसाठी प्रतिक्षालय, बेंच, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर आदी सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदारांच्या मदतीसाठी वोटर हेल्पलाईन ॲप
निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाईन ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपद्वारे मतदारांना मतदार यादीत आपले नाव व मतदान केंद्राची माहिती करुन घेता येणार आहे.
मतदानासाठी १२ ओळखपत्र ग्राह्य...
मतदान कार्ड अभावी मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यानुसार आधार कार्ड, पॅन कार्ड,मनरेगाचे रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांचे अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मतदारांनी यापैकी कोणतेही ओळखपत्र सोबत आणून मतदान करावे.
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा दिवस आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भीडपणे बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.