BREAKING बुलडाण्यात विजयराज शिंदेंची माघार! म्हणाले, बुलडाण्यात लक्ष घालणार नाही...

 
  
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आज अखेर भाजपनेते विजयराज शिंदे यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. आ.गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यात उघडपणे युद्ध सुरू होते, दोघांकडून एकमेकांचा बाप देखील काढल्या गेला..त्यामुळे विजयराज शिंदे माघार घेतील की नाही अशा चर्चा सुरू होत्या. काल मुंबईत विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्याच बैठकीत युतीधर्म पाळण्याच्या सूचना विजयराज शिंदे यांना देण्यात आल्या होत्या. अखेर आज, विजयराज शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.. मी पक्षाची शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षाचा निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे असे विजयराज शिंदे म्हणाले.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे देखील उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विजयराज शिंदे म्हणाले की, मी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली होती. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत आमची काल, मुंबईत चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांचा अवमान आमच्या उमेदवाराकडून होणार नाही असा शब्द दिला आहे, त्यामुळे पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून मी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या काळात मी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर, तिवसा व मोर्शी या मतदारसंघात पक्षाचे काम करण्यासाठी जाणार असल्याचे ते म्हणाले...