महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या अध्यक्षपदी विजय टेकाळे ; बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राला मिळाला पहिल्यांदाच मान ; अविरोध झाली निवड...
Dec 28, 2024, 14:59 IST
बुलढाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) :प्रशासकीय सेवा आणि संघटनात्मक कामाच्या जोरावर महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या अध्यक्षपदी विजय टेकाळे याची अविरोध निवड झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राला हा मान पहिल्यांदाच मिळालेला आहे. विशेष म्हणजे विदर्भातून आतापर्यंत या संघटनेच्या शीर्षस्थ पदावर कोणाचीही वर्णी लागलेली नव्हती.
महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाची बैठक हिंगोली येथे नुकतीच संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी समन्वय महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेवराव डुबल (सातारा) होते.
तर प्रमुख पाहुणे म्हणून घटक शाखांचे पदाधिकारी म्हणून अनिल सूर्यवंशी ( अध्यक्ष राज्य तलाठी संघ), निळकंठ उगले (कार्याध्यक्ष राज्य तलाठी संघ ), बाळकृष्ण गाढवे (अध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर २), संजय अनव्हणे ( सरचिटणीस विदर्भ पटवारी संघ) , हरिश्चंद्र मलिये ( सरचिटणीस विदर्भ मंडळ अधिकारी संघ) तसेच कोकण तलाठी संघाचे अध्यक्ष श्री. गवस यांची उपस्थिती होती. प्रारंभी विषय सूचीप्रमाणे कामकाज पार पडले. त्यानंतर वरील चारही संघटनेची शीर्षस्थ संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाची पुढील कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विजय टेकाळे यांची महाराष्ट्र तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. तर महासंघाचे सरचिटणीस पदी हरिश्चंद्र मलिये (नागपूर) , मुख्य मार्गदर्शक म्हणून ज्ञानदेवराव डुबल (सातारा) , श्याम जोशी (वाशिम) यांची मुख्य सल्लागारपदी निवड करण्यात आली. सभेच्या यशस्वीतेसाठी तलाठी संघ हिंगोलीचे अध्यक्ष श्री.ठाकरे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या निवडीनंतर सर्वच पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आनंद साजरा केला.
सहकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काम करत राहणार- विजय टेकाळे
मुळामध्ये संघटनेची वज्रमूठ हीच आपली मोठी ताकत आहे. संघटना आणि सहकाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण यापुढेही काम करत राहू , अशी ग्वाही यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष विजय टेकाळे यांनी दिली. श्री. विजय टेकाळे यांनी १९९१ साली झाडेगाव तालुका शेगाव येथे तलाठी म्हणून आपला सेवा प्रवेश केला. त्यानंतर विदर्भ पटवारी संघाचे शेगाव तालुका अध्यक्ष पुढे बुलढाणा तालुका अध्यक्ष, उपविभाग सचिव , सचिव आणि अध्यक्षपद ते विदर्भ मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या त्यांनी संघटनेमध्ये पार पाडल्या. संघटनेशी ३४ वर्ष कायम एकनिष्ठता राखत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध समस्यांना शासन दरबारी वाचा फोडत, त्या मागण्या मंजूर करेपर्यंत प्रसंगी आंदोलन आणि लोकशाहीच्या मार्गाने लढा उभारण्याचे काम विजय टेकाळे यांनी केले आहे. त्यांच्या निवडीमुळे बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.