

विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याकडे शिवसेनेने सोपवली मोठी जबाबदारी!
Nov 4, 2024, 12:52 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उद्या,५ नोव्हेंबर पासून प्रचाराचा धुराळा उडणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याकडे एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. प्रतापराव जाधव शिवसेनेचे स्टार प्रचारक असणार आहेत.
शिवसेनेने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सोपवली आहे. त्यात पाचव्या क्रमांकावर ना.प्रतापराव जाधव यांचे नाव आहे. या यादीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ, निलम गोऱ्हे, राहुल शेवाळे, अभिनेता शरद पोंक्षे यांची नावे आहेत. राज्यभरातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराची जबाबदारी या स्टार प्रचारकांवर असणार आहे.