मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी घेतला बुलडाण्याचा आढावा! जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित! एकजुटीने लढण्याचा निर्धार...

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा आचारसंहिता तोंडावर आलेली आहे. त्यामुळे पक्ष पातळीवर देखील बैठकांचे सत्र वाढले आहे. बुलडाणा जिल्ह्यात दोन आमदार आणि एक खासदार यांनी पक्ष सोडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं लक्ष सर्वाधिक हे बुलडाण्यावर असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. त्यातच आज,७ ऑक्टोबर रोजी मातोश्रीवर खुद्द ठाकरे यांनीच बुलडाणा, सिदखेडराजा व मेहकर विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात आढावा बैठक घेतली. यात सर्वाधिक चर्चा ही बुलडाणा विधानसभा मतदारसंघा संदर्भातच झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
 महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढाई आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात दिसेल असे चित्र आहे. त्यातच तिसऱ्या आघाडी आणि अपक्षांचा जोर काय राहतो यावर बरेचशे चित्र अवलंबून राहील. सध्या जागा वाटपाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. महाविकास आघाडीत नेमक्या जागा कुणाला सुटणार यावर खल सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलडाणा, मेहकर आणि सिंदखेडराजा या तीन विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरत होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर विद्यमान दोन आमदार आणि खासदार यांनी ठाकरेंची साथ सोडली. साहजिकच त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले. वातावरण बऱ्यापैकी सोबतीला असतानाही आणि लोकसभा निवडणुकीत "गद्दारी विरुद्ध खुद्दारी"चा माहोल बनलेला असूनही झालेला पराभव हा ठाकरेंच्या जिव्हारी लागलेला आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीत आपल्या जागा आणि त्यावरचे उमेदवार या संदर्भात स्वतः ठाकरे लक्ष घालून आहेत. 
 
 त्या दष्टीने आज मातोश्रीवर बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, सिंदखेडराजा व मेहकर या तीन विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक त्यांनी घेतली. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे धोरण लवकरच जाहीर होईल असे संकेत आहेत. त्यामुळे ग्राउंड लेव्हलवरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी पक्षश्रेष्ठी कामाला लागलेले दिसून येत आहेत.
या बैठकीला शिवसेना सचिव विनायक राऊत , शिवसेना सचिव आ. मिलींद नार्वेकर, संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सह संपर्क प्रमुख छगन मेहेत्रे, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे, यांच्या सह तीनही विधानसभा मतदार संघातील उप जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांची उपस्थिती होती.