उबाठा शिवसेनेच्या ट्रॅक्टर मोर्चाने बुलडाणा दणाणले! शेतकरी कर्जमुक्तीच्या मागणीसाठी हजारो ट्रॅक्टर रस्त्यावर! भर उन्हात यंत्रणेला फुटला घाम!
नरेंद्र खेडेकर म्हणाले, देता की जाता की खाता लाथा? ना.प्रतापराव जाधवांवरही हल्लाबोल! जयश्रीताई, जालिंधर बुधवंतांसह आ. खरातांचेही भाषण गाजले.....
Updated: May 2, 2025, 16:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज, २ मे रोजी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर मोर्चा ने जिल्हा मुख्यालय बुलढाणा अक्षरशः जाम होऊन गेले होते. निवडणूक पूर्व काळात दिलेला आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेने ( उबाठा )या प्रचंड धडक मोर्चातून महायुती सरकारला जाब विचारला. शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले होते.

जिजामाता प्रेक्षागार परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली. संगम चौक, जयस्तंभ चौक, मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन शिवसेना (उबाठा) शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना रीतसर सुपूर्त केले. त्याआधी जिजामाता प्रेक्षागार जवळील टिळक नाट्य क्रीडा मंदिराच्या मैदानात रणरणत्या उन्हात जाहीर सभा पार पडली. मोर्चाएवढीच या सभेतील भाषणेही दणदणीत झाली. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख बुधवंत आणि आमदार सिद्धार्थ खरात यांची भाषणे सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ठरली. नरेंद्र खेडेकर यांनी त्यांच्या खास शैलीत सरकारवर आसूड ओढला, यावेळी त्यांनी केंद्रित मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर देखील भूमिपुत्र या विशेषणावरून निशाणा साधला...
यावेळी सभेला संबोधित करताना नरेंद्र खेडेकर म्हणाले की, हा देश कृषिप्रधान आहे. मात्र निवडणुकीच्या वेळेस भूलथापा देऊन शेतकऱ्यांची मते घेतल्या जातात हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांना निवडणुकीच्या वेळी वेगवेगळी आश्वासने दिली, मात्र त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांनी काही चोरी केली नाही. अदानी, अंबानी यांचं हजारो कोटींचं कर्ज माफ होत मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला सरकारकडे पैसे नाही का? असा सवाल नरेंद्र खेडेकर यांनी केला.जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पिक विम्यापासून अपात्र ठरवण्यात आले. काही शेतकऱ्यांना २०० रुपये,१५० रुपये असा विमा मिळाला. ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा या सरकारने चालवली असल्याचे नरेंद्र खेडेकर म्हणाले.यावेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करून आपला पराभव करण्यात आल्याचा आरोपही नरेंद्र खेडेकर म्हणाले. आम्ही नकली शेतकरी नाही, नकली शिवसैनिक नाही, सेटलमेंट करणारे शेतकरी आम्ही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता शिवसेनेने आता वणवा पेटवला आहे. देता की जाता की खाता लाथा? असाही हल्लाबोल खेडेकर यांनी चढवला. आता निवडणुका नाही,कोणताही पक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. अशा स्थितीत शिवसेना शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कर्जमाफीचा लढा लढेल असे नरेंद्र खेडेकर म्हणाले.

केंद्रीय मंत्री जाधवांवर हल्लाबोल...
आपले खासदार स्वतःच्या गाड्यावर भूमिपुत्र लिहितात. हे कसले भूमिपुत्र? स्वतःच साधलं म्हणून भूमिपुत्र झाला का? कित्येक लोकांचे, बँकेचे पैसे बुडवले. केसगळती झाली, नख गळती झाली आणि मुंडके गळती करता का? आरोग्य मंत्री खाती मिळवलं पण जिल्ह्याच आरोग्य ठीक नाही..त्यामुळे या पदावर राहायचा अधिकार नाही असा हल्ला खेडेकर यांनी चढवला.

आंदोलनाचा वनवा सरकारला भस्मसात करेल: जयश्रीताई शेळके
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणून ते सत्तेत आले. मात्र तीन महिन्यांच्या आता त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. हे सरकार विश्वासघातकी आहे..उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिलेला शब्द पाळणे म्हणजे काय असते हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली. मात्र आताचे हे महायुतीचे सरकार अतिशय विश्र्वासघातकी आहे असा हल्लाबोल शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केला. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,सलग शेतकऱ्यांना सहा तास वीज देखील हे सरकार देऊ शकत नाही असे जयश्रीताई म्हणाल्या. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. यावेळी जयश्रीताई शेळके यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारीच वाचून दाखवली. महायुती सरकारला लाज वाटली पाहिजे. मंत्र्यांवरचा खर्च कमी करा, जाहिरात बाजी खर्च कमी करा पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा असे जयश्रीताई म्हणाल्या. शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा आंदोलनाचा वणवा पेटवत आहे. या वणव्यात हे महायुती सरकार भस्मसात होईल असे जयश्रीताई शेळके म्हणाल्या.

सरकारला सळो की पळो करून सोडू: जिल्हाप्रमुख बुधवंत
शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत म्हणाले की,शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. बेरोजगारी वाढली आहे. गावागावात प्यायला पाणी नाही. सरकारने जुमला करून, वेगवेगळी आश्वासने करून निवडणुका जिंकल्या. मात्र आश्वासनांची पूर्तता होत नाही. कर्जमाफीचे आश्वासन दिले मात्र आता त्यावरून सरकारने शब्द फिरवला आहे. लोकांची दिशाभूल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.. मात्र सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. पुढच्या ५ वर्षात विरोधी पक्ष या नात्याने जनतेच्या मागण्यांसाठी सरकारला सळो की पळो करून सोडू असे बुधवंत म्हणाले...

आम्ही वीस असलो तरी फडण"वीस" यांना भारी! आ.खरात
आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, आता शेतकरी जागा झालेला आहे. शिवसेना हा एकमेव पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. महायुतीतल्या एकतरी आमदाराने,नेत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला आहे का?असा सवाल त्यांनी केला. खोटी आश्वासने देऊन महायुतीने सत्ता मिळवली, आता ते सत्तेचे लोणी खाण्यात व्यस्त असल्याचे आ.खरात म्हणाले. नाफेड ची खरेदी केंद्र बंद आहेत. अजूनही २५ टक्के सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. आता झोपेच सोंग घेणाऱ्या सरकारच्या विरोधात शिवसेनेचे भगव वादळ पेटून उठले आहे. आम्ही विरोधात २० आमदार असलो तरी फडण"वीस"ला भारी आहोत असेही आ.खरात म्हणाले. यावेळी दत्ता पाटील, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवा सेना जिल्हाप्रमुख नंदू कराडे, दत्तात्रय लहाने यांचेही भाषण झाले....