चिखली विधानसभेसाठी तुपकर समर्थकांनी थोपटले दंड! पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सक्षमपणे लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार; तुपकर म्हणाले,शेतकरी, शेतमजुरांनो आपली एकजूट कायम ठेवा ...

 
Tupkar
 चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीसाठी रविकांत तुपकर यांचे समर्थक तथा शेतकरीपुत्रांनी दंड थोपटले आहेत. संपूर्ण ताकदीने आणि सक्षमपणे चिखली विधानसभेची निवडणूक लढवायचीच, असा निर्धार कार्यकर्त्यांनी चिखली येथील बैठकीत केला. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे, सर्वांच्या भावना पाहता चिखली मतदारसंघातुन निवडणुकीचा किल्ला लढवू, चिखली विधानसभेत आपला तगडा उमेदवार असेल, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. शेतकरी, शेतमजूर व युवकांनी आपली एकजूट कायम ठेवावी असे, आवाहन देखील त्यांनी यावेळी बोलतांना केले.
 चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक काल, २५ नोव्हेंबर रोजी रविकांत तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मौनीबाबा संस्थान येथे पार पडली. या बैठकीत सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीचा मागॊवा घेतानाच येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्त्यांनी भावना मांडल्या. चिखली मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीत रविकांत तुपकर यांना जवळपास ४५ हजार मते मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहता शेतकरी, शेतमजूर, तरुण व सर्वसामान्यांची मोठी ताकद आपल्या पाठीशी असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे आपण चिखली विधानसभेतून निवडणूक लढवली पाहिजे, अशा भावना यावेळी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी मांडल्या, सर्वांच्या भावना पाहता चिखली विधानसभेची निवडणूक ताकदीने लढवू त्यासाठी शेतकरी, शेतमजूर व तरुणांनी आपली एकजूट दाखवून द्यावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले.
    पुढे बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की निवडणुकीच्या तोंडावर आता सत्ताधारी व विरोधक अशा सर्वच नेत्यांना शेतकऱ्यांची आठवण होत आहे, परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता उलट आजवर त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज का उठवला नाही..? याबाबत त्यांना आपण विचारणा केली पाहिजे. पिकविम्याची रक्कम देण्यास विलंब केल्याने पिकविमा कंपनीवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १२ % व्याजाने पैसे वसूल का केले नाही..? सोयाबीन-कापसाच्या अनुदानाचे काय झाले..?शेतकऱ्यांच्या विविध मगण्यांसाठी हे पुढारी आजवर पुढे का आले नाहीत..? आता निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शेतकरी आठवतो का..? असा सवाल रविकांत तुपकर यांनी केला. लोकसभेत आपल्याला मिळालेली अडीच लाख मते ही शेतकऱ्यांची खरी ताकद आहे. ही अडीच लाख मध्ये पाहूनच आता सर्व नेत्यांना शेतकऱ्यांची आठवण होत आहे, चिखली मतदारसंघात जवळपास ४५ हजार मते मिळाली ही मते वाया गेली नाही तर या मतांवरून शेतकऱ्यांची ताकद सिद्ध झाली आहे, हीच ताकद कायम ठेवण्यासाठी सर्व शेतकरी, शेतमजूर व शेतकरीपुत्रांनी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले. 
   येणारी विधानसभा निवडणूक आपल्या ताकदीने लढायची आहे त्यासाठी तयार रहा, असे देखील त्यांनी सांगितले. या बैठकीला चिखली मतदारसंघातील रविकांत तुपकर समर्थक तथा शेतकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.