ठाकरेंच्या सभेला बुलडाण्यात तोबा गर्दी; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली; गद्दारांना गाडा म्हणाले; जयश्रीताईंना विजयी करण्याचे आवाहन! आणखी काय म्हणाले ठाकरे..वाचा..
Nov 8, 2024, 15:49 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज बुलडाण्यात जाहीर सभा पार पडली. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांच्या प्रचारासाठी पार पडलेल्या सभेला प्रचंड गर्दी उसळली होती. या सभेत झालेली भाषणेही प्रचंड वादळी ठरली.. उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवारावरही त्यांनी नाव न घेता हल्ला चढवत गद्दारांना गाडण्याचे आवाहन केले. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही उद्घव ठाकरे यांनी केले. यावेळी उमेदवार मंचावर खा.अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, विधान परिषद सदस्य धीरज लिंगाडे,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, माजी आमदार रेखाताई खेडेकर, उमेदवार जयश्रीताई शेळके,माजी आमदार धृपतराव सावळे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते..
यावेळी पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात आपलंच वार आहे.दुसऱ्या कुणाचं वार नाही.लोकसभेला निसटता पराभव झाला पण तो चटका लावून गेला.त्या गद्दाराची वेळ टळली पण या गद्दाराची वेळ टळणार नाही.या गद्दाराला गाडायच म्हणजे गाडायाचंच असे उद्घव ठाकरे म्हणाले. मोदींना कोण हरवू शकेल असे अनेकांना वाटू शकत होते..मात्र महाराष्ट्रानेच त्यांना रोखले असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या विरोधात महाराष्ट्रद्रोही आहेत.गेल्या २०१९ ला माझी चूक झाली.मात्र आता जयश्रीताई आपल्या उमेदवार आहेत,त्यामुळे आता त्या चुकीची पुनरावृत्ती होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात आपल सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. हे गद्दार जिकडे पळून गेले त्या सुरत मध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे असेही ठाकरे म्हणाले. महायुतीवाले केवळ मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात असा हल्लाबोलही ठाकरे यांनी चढवला. जाऊ तिथे खाऊ अशी महायुती सरकारची वृत्ती आहे, या गद्दरांना कचऱ्यापेक्षा कमी भाव देऊन फेकून द्या. ही मशाल आता पेटलेली आहे असेही ठाकरे म्हणाले. विरोधकांना प्रचारासाठी बाहेरून लोक आणांवी लागत आहे असे म्हणत त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर
स्वावलंबी महाराष्ट्र आणि सर्वोत्तम महाराष्ट्र मी तुम्हाला करून दाखवेल असा शब्दही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
विदर्भाने भाजपला सर्वाधिक जागा दिल्या. गेल्या १० वर्षांत विदर्भातील किती तरुणांना रोजगार मिळाला? असा सवाल यावेळी ठाकरे यांनी केला. मी अडीच वर्षांत काम करून दाखवलं होत म्हणून बोलतोय असेही ते म्हणाले.सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करणार आहोत.डाळ, तांदूळ, तेल, गहू, साखर या ५ जीवनावश्यक वस्तूंचे भाव शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान न होता आम्ही स्थिर ठेवून दाखवू असेही उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून म्हणाले. बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून जयश्रीताई शेळके यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन उद्घव ठाकरे यांनी यावेळी केली...